
‘सीजीएसटी’च्या दोन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
पुणे, ता. २५ : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्ष २०२३ साठी असाधारण ‘गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल’ २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘विशेष प्रतिष्ठित सेवेसाठी’ प्रशंसा प्रमाणपत्रे आणि राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. त्यामध्ये पुणे विभागातून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) विभागाच्या मुख्य आयुक्त कार्यालयातील अधीक्षक नितीन विनायकराव गायकवाड आणि पुणे-एक आयुक्तालयातील पुणे झोनचे अधीक्षक प्रशांत अरविंद रोहनेकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. नितीन गायकवाड यांना नुकतीच सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे.
गेली ३१ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्याबाबत केंद्र सरकारकडून हा सन्मान मिळाला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. माझे वडील विनायकराव विष्णू गायकवाड यांनाही १९८८ मध्ये हा सन्मान प्राप्त झाला होता. त्यामुळे या पुरस्काराचा विशेष आनंद आहे.
- नितीन गायकवाड,
सहायक आयुक्त, मुख्य आयुक्त कार्यालय (सीजीएसटी)
केंद्र सरकारकडून हा सन्मान मिळाला, ही बाब गौरवाची आणि अभिमानास्पद आहे. या विभागात गेली ३१ वर्षे सेवा करीत असताना कष्टाचे चीज झाले, याचे समाधान वाटते.
- प्रशांत रोहनेकर,
अधीक्षक, पुणे झोन (सीजीएसटी)