
क्षण बहराचे समाजमाध्यमांवर ते पेरतात सकारात्मक संवाद
‘मन माझे गुणगुणते माझ्याशी ते कधी कधी / जाणुनी घ्यावा अर्थ अन् वागावे ते या जगती,’ या ओळींमधून ते समाजमाध्यमांवरील त्यांच्या वाचकांच्या मनात सकारात्मकता पेरतात. हे गेली दोन वर्षे रोज चालले आहे. डॉ. सुभाष यशवंत पवार यांचे वय आता अठ्ठ्याहत्तर पूर्ण असल्याचे, त्यांना नव्याने भेटणाऱ्यांना अजिबात खरे वाटत नाही.
ज्ञानसाधना व सामाजिक कर्तव्य, या दोन्हींचा मिलाफ असलेले पवार आजही विविध प्रकारच्या कामांमध्ये रममाण असतात. ते म्हणाले, ‘‘मी इंजीनियरिंग, जी डी आर्ट, डीबीएम, पत्रकारिता आदी निरनिराळे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. संगणक तज्ज्ञ म्हणून सीडॅक या संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील पेस प्रोग्रॅमचा मी समन्वयक होतो. तळागाळापर्यंत संगणक पोहोचवण्यासाठी हे कार्य व्यापक प्रमाणात करण्यात आले. आतापर्यंत मी इंग्रजी व मराठीतून एकशेवीस पुस्तकांचे लेखन केले आहे. यांपैकी पंच्याण्णव पुस्तके संगणक क्षेत्राशी संबंधित आहेत. साहित्यिक लेखनही मी बरेच केले आहे. एका पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. सध्या मी भगवद्गीता व ज्ञानेश्वरी संदर्भातील माझे विचार साध्या, सोप्या भाषेत रोज लिहितो. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या भाविकांना त्यातील अर्थ आजच्या संदर्भात सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. समाजमाध्यमांवर हे लिखाण प्रसारित करतो.’’
पवार यांनी असेही सांगितले, ‘‘मी समाजमाध्यमांवर दोन वर्षे दररोज एक कविता व एक चित्र प्रसारित करतो. चित्र मी डिजिटल आर्टच्या तंत्राने काढतो. रोजची कविता सुरू होते ती ‘मन माझे गुणगुणते माझ्याशी ते कधी कधी,’ या ओळीने. मनात येणाऱ्या भावना, चिंतन, मनन आदी या कवितांमधून मी व्यक्त करतो. सकारात्मक विचार पेरत राहावेत, असे वाटते.’’
आजची उदाहरणे देत लेखन!
माझे बालपण पंढरपूरमध्ये गेले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा प्रभाव मनावर आहे. प्राचीन काळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या जीवनभाष्यावर नंतरच्या काळात संत ज्ञानेश्वर माउलींनी तेव्हाच्या मराठीत भाष्य केले. आजमितीला ती भाषाही फार जुनी झाल्याने आजच्या पिढीला ती पूर्णपणे समजत नाही. यासाठी मी आजच्या भाषेत, आजची उदाहरणे देत हे लेखन करतो आहे. हेसुद्धा समाजमाध्यमांवर प्रसारित करत असतो, असेही पवार म्हणाले.