‘त्या’ डोळ्यांकडे पाहिले वेगळ्या नजरेने! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ डोळ्यांकडे पाहिले
वेगळ्या नजरेने!
‘त्या’ डोळ्यांकडे पाहिले वेगळ्या नजरेने!

‘त्या’ डोळ्यांकडे पाहिले वेगळ्या नजरेने!

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘एप्रिल २०२१. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर उद्रेक सुरू होता. त्यातच काळी बुरशी या नावाने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. माझ्या आईला एका डोळ्याने सगळ्या गोष्टी दोन दिसायला लागल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. काळी बुरशी डोळ्यापर्यंत पसरली होती. आता डोळा की प्राण वाचवायचे असा प्रश्न होता. अर्थात, मी प्राण वाचवू डोळ्याचं पुढं बघू, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना म्हणालो. पण, त्याचवेळी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डोळ्यांचे डॉक्टर रमेश मूर्ती आले. ते म्हणाले, ‘प्राणासह दृष्टी वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करू’ या आश्वासन वाक्याने दिलासा मिळाला...’’ वरुण बोलत होता...
बोलताना त्याच्या डोळ्यासमोर दोन वर्षांपूर्वीचे भयंकर चित्र स्पष्ट समोर उभे राहिल्याचे जाणवत होते. जेमतेम पंचविशीतील त्या मुलाच्या आईला म्युकरमायकोसिस हा प्राणघातक आजार झाला होता. ‘‘ही काळी बुरशी त्याच्या आईच्या डोळ्यापर्यंत वाढली होती. डोळा काढण्याचा सल्ला इतर डॉक्टर देत होते. अशा वेळी डॉ. मूर्ती देवदुताप्रमाणे धावून आले,’’ हे बोलताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

काय झाले होते?
- कोरोना उद्रेकाच्या पहिल्या लाटेत कोरोनानंतर अचानक हृदय बंद पडून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रमाण वेगाने वाढले
- दुसऱ्या लाटेत कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची साथसदृश स्थिती निर्माण झाली होती
- पुणे शहरातील रुग्णालयांत त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला होता
- पुणे शहरातील एका रुग्णालयात एका वेळेला या आजाराचे २०० रुग्ण होते
- त्यापैकी शंभर रुग्णांच्या डोळ्यात म्युकरमायकोसिसमुळे गुंतागुंत झालेली
- त्यातून त्यांचा डोळा काढावा लागेल इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली होती

डोळा काढणे हाच पर्याय
म्युकरमायकोसिसमुळे वस्तू दोन दिसणे, डोळा सुजणे, लाल होणे अशा गुंतागुंतीबरोबरच काही रुग्णांमध्ये उपचाराला उशीर झाल्याने डोळा बाहेरदेखील आले होते. अशा रुग्णांमध्ये काळी बुरशी लागलेला डोळा काढणे, हा उपचाराचा मार्ग होता. त्यातून रुग्ण आणि नातेवाईक यांचे मनोधैर्य खच्ची होत.

असे केले उपचार
१. इंजेक्शन : शल्यचिकित्सेमध्ये वापरण्यात येणारी मोठी साई वापरून म्युकरमायकोसिसचे ‘अँफोटेरिसीन बी’ हे इंजक्शन थेट डोळ्यामध्ये देण्यास सुरवात केली. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊ लागले आणि त्यांची दृष्टीही वाचविता आली.
२. बुरशी लागलेलाच भाग काढण्याची पद्धत : डोळ्याला काळी बुरशी झाली की संपूर्ण डोळा काढला जात होता. त्या ऐवजी ज्या भागाला बुरशी लागली आहे, तेवढाच भाग शस्त्रक्रिया करून काढायचा, इतर भागाचे संवर्धन करण्याचा नवा प्रयोग यशस्वी झाला. त्यातून काही रुग्णांची दृष्टी वाचविण्यात यश आले. डोळ्याच्या कोणत्याही भागात बुरशी झालेली असली तरीही शस्त्रक्रिया करता येतात, हा विश्वास नातेवाइकांना त्यातून देता आला, असे डॉ. मूर्ती यांनी स्पष्ट केले.
३. डोळ्याचा दाब नियंत्रण तंत्र : डोळ्याच्या आतमध्ये दाब असतो. तो वाढल्यानंतर कमी करण्यासाठी डोळा आणि नाक याच्यामधली भिंत पाडण्याचेही प्रयोग यशस्वी झाले. त्यातून अनेक रुग्णांची दृष्टी वाचविता आली. त्यातून बुरशीविरोधी औषध थेट पोचविता आले. रक्तप्रवाह वाढला. त्यामुळे रुग्णाचे प्राण आणि दृष्टी वाचविता आली.

डोळा काढून रुग्ण वाचत नाही, तो बरा होत नाही. मग डोळा काढायचा कशाला, असा प्रश्न पडला. त्यामुळे आठ-दहा रुग्णांनंतर डोळा न काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पर्यायी उपचार शोधण्यावर भर दिला.

- डॉ. रमेश मूर्ती, नेत्रतज्ज्ञ, ॲक्सिस आय क्लिनिक