
आशय मोजक्या शब्दांत मांडणे कठीण ः पंडित
पुणे, ता. ३० : कवितेत अनेक भाव, भावना, रस, भावनिष्पत्ती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा कवीचा प्रयत्न असतो. तो नेमक्या व मोजक्या शब्दांत मांडणे, हे अजिबात सोपे नसते. अशांच्या कविता अथवा गीते गाताना मीसुद्धा मूळ आशयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न स्वरांच्या छटांमधून मधून करते, असे भावोद्गार प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी व्यक्त केले.
आघाडीचे कवी व गीतकार वैभव जोशी यांच्या ‘म्हणजे कसं की’ हा कवितासंग्रह आणि ‘काळ सरकत राहिला’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन पंडित तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम गांजवे चौकातील एस. एम. जोशी सभागृहात झाला. ‘रसिक आंतरभारती’तर्फे निर्मित या पुस्तकांच्या प्रकाशनानंतर बोलताना जोशी म्हणाले की, आज आपण विविध कलांमध्ये उभ्या केलेल्या भिंती वैभवच्या कविता नाहीशा करत आहेत. सातत्य, वैविध्य व गुणवत्ता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
या संग्रहांच्या निर्मितीत सहभागी असलेले चित्रकार मिलिंद मुळीक व सुलेखनकार बी. जी. लिमये यांनीही मनोगत व्यक्त केले. शाहीर सुरेश वैराळकर व संगीतकार आशिष मुजुमदार यांनीही विचार मांडले. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, सुनीता नांदूरकर, वनिता जोशी, योगेश नांदूरकर आदी उपस्थित होते. पूनम छत्रे, शेखर डेरे, सायली रत्नपारखी, मिलिंद छत्रे व नचिकेत आठवले यांचाही सत्कार करण्यात आला. उत्तरार्धात वैभव यांनी सादर केलेल्या कवितांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले. शैलेश नांदूरकर यांनी आभार मानले.