ग्लास फुटल्याने बिघडलं फुटलेल्या ग्लासानेच जुळवलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लास फुटल्याने बिघडलं
फुटलेल्या ग्लासानेच जुळवलं!
ग्लास फुटल्याने बिघडलं फुटलेल्या ग्लासानेच जुळवलं!

ग्लास फुटल्याने बिघडलं फुटलेल्या ग्लासानेच जुळवलं!

sakal_logo
By

पाय लागून काचेचा ग्लास फुटल्यामुळे धीरजच्या पोटात गोळा आला. तो घाईघाईने तुकडे गोळा करू लागला.
मात्र, हे दृश्‍य प्रज्ञाने पाहिले.
‘‘अहो, हे काय केलंत? किती वेंधळ्यासारखं वागता. लक्ष कोठं असतं तुमचं. माझ्या आईने या काचेच्या ग्लासचा सेट दिला होता. त्यातील शेवटचा ग्लास राहिला होता. आता तोही फोडलात. माझ्या आईवरील राग काढण्यासाठी तुम्ही तो मुद्दाम फोडला असणार.’’ प्रज्ञाचा जिभेचा पट्टा सुरू झाला.
‘‘अगं माझ्या ध्यानीमनीही तसं काही नाही. मी मुद्दाम ग्लास फोडला नाही.’’ धीरजने खुलासा केला.
‘‘तुम्हाला एक काम धड करता येत नाही की तारतम्याने वागता येत नाही. मी काल तुम्हाला तमालपत्र आणायला सांगितलं होतं तर त्यासाठी तुम्ही पोस्टात गेला होतात. ही तुमची अक्कल. तमालपत्र म्हणजे तुम्हाला काय आंतरदेशीय पत्रासारखं वाटलं का? तमालपत्र हा मसाल्याचा प्रकार आहे. किराणा दुकानात तो मिळतो, हेही तुम्हाला माहिती नसावं.’’ प्रज्ञाने रागाने म्हटले.
‘‘प्लीज, विषयांतर करू नकोस. काचेचा ग्लास माझ्या हातून फुटला. ही माझी चूक आहे. त्याबद्दल सॉरी.’’ धीरजने म्हटले.
‘‘तुम्हाला हजारवेळा सांगितलं असेल, की आपलं भांडण सुरू असताना लगेचच सॉरी म्हणायचं नाही. माझा सगळा मूड जातो. आता मी किती जोषात होते, सॉरी म्हणून तुम्ही त्यातील हवा काढून घेतली.’’ प्रज्ञाने परत त्याला झापले.
‘‘हे बघ, मला भांडण वाढवायचं नाही म्हणून मी सॉरी म्हटलं.’’ धीरजने नांगी टाकली.
‘‘म्हणजे मला भांडण वाढवायचं आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मलाही भांडणं करायला अजिबात आवडत नाहीत. शेजारच्या सुषमासारखी मी काय भांडकुदळ नाही. तरीपण तुमच्या हातून काचेचा ग्लास फुटलाच कसा?’’ प्रज्ञा मूळ मुद्यावर आली.
‘‘माझ्या हातून फुटला नाही. माझा पाय लागल्याने तो फुटला.’’ धीरजने म्हटले.
‘‘पाय लागून असा कसा फुटला? तुमचं लक्षच नसतं कधी. सतत आपल्याच नादात असता. मागच्या आठवड्यात चालता चालता विजेच्या खांबाला धडकलात. मी सोबत असले तरी माझ्या बोलण्याकडंही तुमचं लक्षच नसतं. नजर सतत भिरभिरत असते.’’ प्रज्ञाने असं म्हटल्यावर धीरज शांत बसला. मात्र, प्रज्ञा माघार घ्यायला तयार नव्हती. स्वयंपाक करता करता ती त्याच्या चुकांवर बोट ठेवू लागली. तासभर नवऱ्याची झाडाझडती घेतल्यावर तिला कुठं समाधान मिळालं. मात्र, तरीही बोलण्याच्या नादात किचनओट्यावरील काचेच्या ग्लासला तिच्या हाताचा धक्का लागला व तो फुटला. आवाज ऐकून धीरज धावत आला. त्यावर प्रज्ञा म्हणाली, ‘‘तसाही हा काचेचा ग्लास फार जुना झाला होता. काचेची वस्तू कोणी पाच वर्षे वापरतं का? भंगारात फेकून द्यायचा मी अनेकदा विचार करीत होते. पण राहून गेला. बरं झाला आज तो फुटला.’’
त्यावर धीरज म्हणाला, ‘‘पण यात चूक कोणाची आहे?’’
‘‘अर्थात यात चूक ग्लासचीच आहे. त्याने कशाला किचनओट्यावर कडमडायला यावं. भांड्याच्या कपाटातील आपल्या जागी त्याला नीट बसता येत नाही का?’’ प्रज्ञाने असं म्हटल्यावर धीरजचं लक्ष तिच्या बोटाकडं गेलं.
‘‘अगं तुझ्या बोटातून रक्त येतंय.’’ असं म्हणून त्याने तिच्या बोटावर ओयोडिनयुक्त कापूस दाबून धरला. त्याचं हे वागणं पाहून, तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी आदर दाटला. ‘कोण म्हणतं तुम्हाला तारतम्य नाही,’ असं म्हणून तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून, आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.