
उरुळी देवाची, फुरसुंगी गावांची नवीन नगरपालिका निर्मितीस विरोध
पुणे, ता. ४ ः उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन्ही गावांची नवीन नगरपालिका निर्मिती करण्याची घोषणा गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या निर्णयामुळे या दोन्ही गावांत सुरू असलेली विकासकामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन नगरपालिकेस दोन्ही गावातील बहुतांश ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उरुळी देवाची संघर्ष समितीचे सदस्य, माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेवाळे म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही गावांचा समावेश २०१७ मध्ये पुणे महापालिकेत केला होता. या दोन्ही गावांमध्ये महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. तसेच, नगर रचना योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा नियोजित विकास सुरू झाला होता. ही गावे महापालिकेतून वगळल्यास याचा परिणाम विकास कामांवरही होणार. तसेच, नवीन नगरपालिका आल्यास कामे करण्याकरिता तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल. त्यात येत्या काळात पूर्व भागाची नवीन महापालिका निर्माण झाल्यास पुन्हा आमच्या गावांच्या नवीन महापालिकेत समावेश होणार. त्यामुळे राज्य सराकरने याकडे लक्ष केंद्रित करून दोन्ही गावांना पुणे महापालिकेतच कायम ठेवून वाढीव कराचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.’’
गावाच्या सर्वांगीण व सुनियोजित विकासासाठी महापालिकाच हवी आहे. सराकरने याकडे दुर्लक्ष करत नगरपालिका निर्माण केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी विकास भाडळे, राजेंद्र बाजारी, उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते, गणेश शेवाळे, जितेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.