बाहुल्यांच्या संवादनाट्यातून रंजन, प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाहुल्यांच्या संवादनाट्यातून रंजन, प्रबोधन
बाहुल्यांच्या संवादनाट्यातून रंजन, प्रबोधन

बाहुल्यांच्या संवादनाट्यातून रंजन, प्रबोधन

sakal_logo
By

पुण्यातील सोनिया केतकर या तीस वर्षांपासून बाहुलीनाट्याचे कार्यक्रम करतात. प्रामुख्याने बालकांसाठी असलेल्या या कार्यक्रमांत गंमतगोष्टी व गाण्यांतून चांगल्या सवयींकडे लक्ष वेधले जाते. मोठ्यांसाठी रंजनातून प्रबोधनपर संदेश दिले जातात.
केतकर म्हणाल्या, ‘‘तीस वर्षांपूर्वी मी बालकांसाठी संवादमाध्यमांचा उपयोग या विषयावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या वेळी बाहुलीनाट्य हा त्यातील केवळ एक भाग होता. तेव्हा वाटलेही नव्हते की, हौसेखातर चाललेले बाहुलीनाट्याचे खेळच पुढे माझे जीवितकार्य ठरतील. यात निरनिराळे प्रयोग करत गेले. मुलांची या माध्यमाशी होणारी एकरूपता पाहिली. प्रभाव जाणवला आणि मग यातच आपसूक वाटचाल सुरू झाली. ग्लोव्स पपेटचा वापर आम्ही करतो. हाताच्या पंज्यावर घातलेल्या बाहुल्या, बोटे व मनगटाच्या नियंत्रित हालचालींचा कौशल्याने वापर, खुमासदार संवाद व पात्रानुरूप आवाजाचा हुकमी उपयोग यांतून धमाल बाहुलीनाट्य उभे राहते.’’
केतकर यांनी असेही सांगितले की, सर्वसामान्य व विशेष मुलांसाठी या माध्यमातून खेळ करत गेले. माझ्यासोबत दोन-तीन मैत्रिणी यात सहभागी असतात. चामड्यापासून चित्रात्मक आकारातील बाहुल्यांचा वापर करून आम्ही छायानाट्यही सादर करतो. अंधारलेल्या जागी पडद्यामागील बाहुल्यांच्या सावल्यांमधून होणारा प्रभाव गूढ, रम्य व तरल असतो. मुले कुतूहलमिश्रित आनंदाने प्रतिसाद देत असतात. विविध शाळा, रंजन केंद्रे व संस्थांमध्ये आम्ही कार्यक्रम केले. काही ठिकाणी कार्यशाळांमधून या कलेचे प्रशिक्षणही दिले. तीस ते चाळीस मिनिटांत गमतीदार संवादातून वृक्षतोड, कचरा, जलप्रदूषण वगैरे विषयांकडे लक्ष वेधले. मुलांना दात घासणे, हात धुणे यांसारख्या चांगल्या सवयी लावण्याचे संदेश दिले. काही संस्थांसाठी ठराविक वस्त्यांमध्ये कुटुंब नियोजन व एड्स आदींविषयी माहिती देण्यासाठी आम्ही बाहुलीनाट्य तंत्राचा वापर केला.