संरक्षण क्षेत्र, उद्योगांचे एकत्रित काम गरजेचे

संरक्षण क्षेत्र, उद्योगांचे एकत्रित काम गरजेचे

Published on

पुणे, ता. ८ ः ‘‘लष्करी उपकरणे तयार करण्यात महासत्ता म्हणून उदयास येण्याची क्षमता भारतामध्ये आहे. देशाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत मोठे व महत्त्वाचे व्यासपीठ विकसित करण्याची क्षमता दाखवली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात, जागतिक स्तरावर संरक्षण उत्पादने बनवण्यासाठी संरक्षण क्षेत्र आणि उद्योगांनी एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे.’’ असे मत भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले.

निबे लिमिटेड या संरक्षण दलांसाठी साहित्य सामग्री उत्पादन करणाऱ्या कंपनीतर्फे आयोजित ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) डिफ एक्स्पो २०२३’ या संरक्षण उत्पादन, प्रणाली व तंत्रज्ञान प्रदर्शनाचे मंगळवारी जनरल चौहान यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. निबे लिमिटेडच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित चाकणजवळ खालुब्रे एमआयडीसी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संरक्षण क्षेत्रासाठी विविध सामग्री तयार करणाऱ्या ३७ उद्योगांनी या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनाची पाहणी जनरल चौहान यांनी केली.

या वेळी जनरल चौहान म्हणाले, ‘‘सशस्त्र दले अद्ययावत होण्यासाठी संरक्षण क्षेत्र, संशोधन संस्था, निर्मिती उद्योग एकत्र येऊन योगदान देण्याची गरज आहे. शक्तिशाली भारताची कल्पना जेव्हा होते तेव्हा, सशस्त्र दलांकडे मुख्य लक्ष जाते व त्यांच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. परंतु सशस्त्र दलांच्या मागे एक मोठी संरक्षण परिसंस्था उभी आहे, जी देशाला सामर्थ्यवान बनवत आहे. तसेच ही संरक्षण परिसंस्था सशस्त्र दलांच्या बरोबरीने काम करते.’’

निबे लिमिटेडकडून संरक्षण दलांसाठी ब्रिज इक्विपमेंट, क्रेन्स, नेव्हल स्ट्रक्चर्स, फ्युएल स्टोरेज टँक, मिसाईल लॉंचर स्ट्रक्चर, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, केबल वायर हार्नेस, राऊटर्स अशी अनेक उपकरणे तयार केली जातात. दरम्यान या प्रदर्शनात या सर्व संरक्षण उपकरणांबरोबर रोबो वेल्डिंग, इलेक्ट्रिक वाहने, वेल्डिंग गँट्री, कुका रोबो, मशीनगन आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाप्रसंगी निबे लिमिटेडचे संस्थापक गणेश निबे, एअर व्हाईस मार्शल एस.जे.पेंडसे, मेजर जनरल विक्रांत नायक, रिअर अॅडमिरल अर्जुन देवनायर, विकास चावला एच.आर. गायकवाड आदी उपस्थित होते.

उद्योगांना प्रोत्साहन मिळेल!
आत्तापर्यंत भारताला मोठे आणि गुंतागुंतीचे व्यासपीठ विकसित करता येत नाही अशी मानसिकता होती. मात्र, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडच्या नव्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्‍घाटन केले. यामुळे अनेक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल, असेही जनरल अनिल चौहान यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.