
‘स्क्रीनटाइम’कडे बघा डोळसपणे!
पुणे, ता. १० : ‘‘अबीर या माझ्या चार वर्षांच्या मुलाला आम्ही ‘टेक्नोसॅव्ही’ करतोय. तो मोबाईल, टीव्हीचा रिमोट, टॅब हा खूप लिलया हाताळतो. तो सकाळी टीव्हीवर कार्टून आणि दुपारी यूट्युबवरील लहान मुलांच्या गोष्टी मन लाऊन बघतो. डाऊनलोड केलेली शुभंकरोती लावून टॅब त्याच्या हातात देतो,’’ गंधाली अभिमानाने सांगत होती. हे सांगताना त्या कोवळ्या जिवाच्या डोळ्यांवर आपण स्क्रीन टाइम लादतोय हे तिच्या गावीही नव्हते. त्याचा दूरगामी दुष्परिणाम त्या मुलाच्या डोळ्यांवर होण्याची शक्यताही नेत्रतज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
समीर आणि गंधाली दोघंही माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंते. अबीरच्या शिक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी अमेरिकेहून पुण्यात आले. अबीरला भारतीय संस्कृतीचे संस्कार करण्याचा हे दांपत्य प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी टेक्नॉलॉजीचे माध्यम वापरले. त्यातून डोळ्यांच्या आरोग्याचा संभाव्य धोका उद्भवतो, असेही नेत्रतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
चष्मा वापरणारी मुले वाढण्याची कारणे
- कोरोना उद्रेकामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांचे मैदानी खेळ कमी झाले. बाहेर फिरायला जाऊन दूरपर्यंतचे निसर्ग सौंदर्य न्याहाळता आले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्याला सतत फक्त जवळचे पाहण्याची सवय लागली.
- त्यातून मायोपिया म्हणजे डोळ्यांना जवळचे स्पष्ट दिसते, पण दूरचे पहाण्यासाठी चष्मा वापराला लागतो, याचे प्रमाण मुलांमध्ये वाढले.
- आई-वडीलांना चष्मा असेल तर मुलांना चष्मा लागण्याची शक्यता जास्त असते
धोका काय आहे?
- ५ ते १५ वर्षे वयोगटातील साडेसात टक्के मुलांना चष्मे लागत आहेत. विशेषतः शहरातील मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.
- २०५० पर्यंत याच वयोगटातील ४८ टक्के मुलांना चष्मे असतील, असे एक भाकीत नोंदविले आहे.
- ‘प्लस पॉइंट ५०’ ते ‘मायनस पॉइंट ७५’ तर तो वाढण्याची नंबर मुलांमध्ये वाढण्याचा धोका असतो.
- सतत डोकेदुखी, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांवर ताण येणे, अंधूक दिसणे
हे बदल तातडीने करा
- लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा
- रोजचे ४० मिनीट ते दीड तास मैदानी खेळ खेळा
- डोळे आणि हात यांचे एकसूत्रता वाढविणे
- नैसर्गिक जीवनसत्वे मिळतील असा आहार
पालकांनी काय करावे?
- लहान मुले आई-वडीलांचे अनुकरण करत असल्याने मुलांसमोर सतत मोबाईल पाहणे टाळावे
- मुलांच्या कल्पकतेला चालना मिळेल अशा उपक्रमांवर भर द्या
- छापील पुस्तके विकत आणून वाचावी
- मुलांना सोबत घेऊन दिवसभरात कधीही व्यायाम करावा
चष्म्याचा नंबर टाळण्यासाठी वैद्यकशास्त्रात ठोस कोणतेही प्रतिबंधक उपाय नाहीत. योग्य जीवनशैली आणि पोषक आहार हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. पाच ते सात वर्षांच्या मुलांमध्ये डोळे आणि हात यात समन्वय महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. तसेच, ऑनलाइन शाळा, क्लासेस यामुळे स्क्रीनवर जवळचे बघण्याची सवय मुलांना लागली आहे. ती बदलण्यासाठी तातडीने उपयायोजना करण्याची वेळ आता आली आहे.
- डॉ. श्रद्धा पुराणिक, नेत्रतज्ज्ञ, पूना हॉस्पिटल
सातत्याने स्क्रीनसमोर राहिल्याने ‘ड्राय आय सिंड्रोम’ होतो. डोळे चोळले गेल्याने ते लाल होता. स्क्रीन टाइम वाढल्याने असलेला चष्म्याचा नंबर वेगाने वाढण्याची शक्यता असते. त्याचा दीर्घकालीन परिणाम त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होतो.
- डॉ. जाई केळकर, नेत्ररोग तज्ज्ञ, एनआयओ