
बालकांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी...
अमेरिकेतील मिनेसोटा येथील डेझी लियोनार्द ही तरुणी सध्या पुण्यात लक्षवेधी कामगिरीत गुंतली आहे. सहा महिन्यांसाठी ती येथे सामाजिक कार्याच्या ओढीने आली आहे. ‘आशा’ या संस्थेतर्फे चालणाऱ्या सेवा कार्यात ती स्वयंसेवक म्हणून सामील झाली आहे. शिवाय सारसबागेसमोरच्या बालभवनमधील बालकांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी ती तायक्वांदो या खेळाचा उपयोग करते.
बालभवनमध्ये डेझी आठवड्यातील दोन दिवस येते. आळीपाळीने एकेका गटाच्या बालकांना ती तायक्वांदो हा खेळ शिकवते. हा खेळ कुणालाही इजा पोहोचविण्यासाठी नाही. कुणावरही चाल करून जाण्यासाठी नाही. कुणाला घाबरवण्यासाठी नाही. वेळ पडल्यास फक्त आत्मसंरक्षणासाठीच याचा वापर केला जावा, ही जबाबदारीची भावना मुलांच्या मनात बिंबवते. या खेळाच्या सरावा दरम्यान मुले एकमेकांवर लुटुपुटूची चढाई करतात, स्वतःला वाचवतात, प्रतिस्पर्ध्याला चकवून त्याच्यावर वार करतात. हे सारे केवळ आपल्या क्षमता वाढविण्यासाठी. शक्ती परजत राहून सतर्क व सावधपणा तेवत ठेवण्यासाठी, याचे भान ती मुलांना देत असते. या निमित्ताने हे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचे लक्ष आहार व व्यायामावर केंद्रित होते आहे.
शिकविण्याची पद्धत
डेझी म्हणाली, ‘‘प्रशिक्षणाचा भाग म्हणून मुठी घट्ट मिटून हल्ल्याच्या तयारीचा सराव चाललेला असताना एका मुलीच्या मुठी अत्यंत आक्रमकतेने वळलेल्या असत. यावरून जाणवले की, या भावनेमागे तिच्या मनातील असुरक्षितता, भीती वगैरे असू शकते. तायक्वांदोच्या सरावात तिच्या मनातील या आक्रमकतेला वाट मिळेल. काही दिवसांनी तिच्या मनात इतरांबद्दल स्नेह, स्वागत, सकारात्मक विचारांच्या नवीन भावना रुजतील, अशी आशा वाटते. मी मुलांशी हे सारे बोलत असते.’’
परत गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण
डेझीने सांगितले की, माझा जन्म शांघायचा. मिनेसोटामधील आईबाबांनी मला दत्तक घेतले. पुण्यातील खुशी आणि इथियोपियातील सनी या माझ्या दोन दत्तक बहिणींनाही त्यांनीच पालक म्हणून भरभरून प्रेम दिले. आम्हा तिघींनी मानवतेचे नाते अंगीकारावे, यासाठी आम्हाला सर्व धर्मांच्या देवळे, प्रार्थना मंदिरांमध्ये त्यांनी विश्वबंधुत्वाची सखोल ओळख करून घेण्यासाठी पाठवले. माझे वय सध्या एकोणीस. हे संबंध वर्ष आईबाबांनी आम्हा तिघींना आपापल्या शोधाच्या आधारे निवडलेल्या सामाजिक संस्थांमध्ये राहायला उद्युक्त केले आहे. येथून मिनेसोटाला परत गेल्यावर मी महाविद्यालयीन शिक्षण घेणार आहे.
मानसशास्त्र विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. परंतु त्याआधी लोकांमध्ये प्रत्यक्ष राहून, वावरून, त्यांच्या सुख- दु:खाच्या भावभावना समजून घेणे माझ्या पुढील अभ्यास व वाटचालीसाठी भक्कम पाया निर्माण करणारे ठरेल. विचार, मनन, चिंतनाला चालना देणारे ठरेल.
- डेझी लियोनार्द
काही निरीक्षणे
- भारतीयच नव्हे तर जगभरातील कुठल्याही मुलांच्या भावभावना साधारणपणे सारख्याच असतात
- आपल्या मनात राग, आनंद, द्वेष, आकर्षण, भीती वगैरे भावना असतात; हे मुलांच्या लक्षात येत नाही
- मी खेळ व गोष्टींच्या माध्यमातून त्यांना आपापल्या मनात कोणत्या भावना उसळतात, याचा शोध घ्यायला सांगते - त्यांना एकदा आपल्या वृत्ती थोड्याफार लक्षात येऊ लागल्या की, त्रासदायक भावनांऐवजी आनंददायी अनुभव देणाऱ्या भावनांचा पाठपुरावा करण्यातली गंमत लक्षात आणून देते
- भावनिक स्वास्थ्याचे पाठ कमी वयात शिकायला मिळावेत
- याने मुले मोठी होताना स्वतःचा व इतरांचा आदर राखत विकसित होण्याची शक्यता वाढते