
खुणावणारा ‘कोरा कॅनव्हास’
वर्तमानाचा ‘कोरा कॅनव्हास’ त्या सात सख्यांना खुणावतो आहे. त्यावर अवतरण्यासाठी भूतकाळातील आठवणी मनात फेर धरत आहेत. त्यांतील नकोशा बाजूस कशा सारायच्या? सुटतच नाही त्यांचा विळखा. जाऊ दे. स्वप्नवत वाटणाऱ्या काही हव्याशा रचना करून पाहू. नवी सुरवात करू, अशा भावभावनांचा कोलाज म्हणजे हे सातजणींचे अनवट नाटक.
मराठी भाषेतील हा दीर्घांक समीप नाट्य पद्धतीने सादर केला जातो. चारही बाजूंनी प्रेक्षक व मधोमध मंच. त्यामुळे आपणही जणू त्या प्रसंगाचाच एक भाग असून फक्त बाजूला बसून असल्यामुळे पात्रांना दिसत नाही, असे जाणवते. या रचनातंत्रामुळे कलावंत व प्रेक्षकांमध्ये जवळीक वाढते. दोघीजणी, चौघीजणी, मैत्रिणी, मायलेकी, मावशी-भाची, फार्म हाउसची मालकीण व तेथील देखभाल करणारी मोलकरीण वगैरे सर्वसाधारण व्यक्तिरेखांमधून लेखक-दिग्दर्शक प्रदीप वैद्य यांनी कथानकाचा पट विस्तारत नेला आहे. वैभवी आफळे-साबणे, प्रिया मुळे, अनुष्का आपटे, समृद्धी मोहरीर, मधुरा गोडबोले, दीपाली जांभेकर, रूपाली भावे या सातजणींनी उत्कटतेने भूमिका साकारल्या आहेत.
या पात्रांना अनेक प्रश्न पडले आहेत. स्वतःविषयी, इतरांविषयी व एकंदरीतच जगण्याविषयी. ते प्रश्न सोपे अजिबातच नाहीत. कधी एकीचा अवघड व बिकट प्रश्न दुसरीला सोपा, सहज वाटतो. कधी खूप काळ कुणा एकीबद्दल मनात बाळगलेल्या संशयाच्या सावल्या आणखी लांबतात. वेगळ्या कोनातून त्यांच्याकडे पाहताच त्या विरू लागतात. सामाजिक चौकटीपलिकडची नाती जगताना होणारे ताणतणाव आत्मविश्वासाला सुरुंग लावतात. मूल होऊ न शकलेली, पण ते होण्यासाठी जंग जंग पछाडणारीच्या मनातील घालमेल नेमकी कशाची? खरोखर मातृत्वाच्या जैविक ओढीची की, समाजाकडून कमी लेखले जाण्याच्या संभाव्य भीतीची? प्रश्नांचे हे प्रातिनिधिक बाण मनोभंग करतात. परंतु नवनिर्मितीचे उपजत वरदान लाभलेल्या या स्त्रिया नव्या आशावादाने समजूतदारपणे वाटचालीसाठी सज्ज होतात. कोरा कॅनव्हास असे अनेक जीवनरंग दाखवतो. वैद्यांनीच नेपथ्य, प्रकाश व पार्श्वसंगीताची जबाबदारी पेलली आहे. वेशभूषा स्मिता तावरे यांनी तर नेपथ्यरचनेतील चित्रे राजू सुतार यांनी केली आहेत.