असा आहे कारभार नाही कसलाच भार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असा आहे कारभार
नाही कसलाच भार!
असा आहे कारभार नाही कसलाच भार!

असा आहे कारभार नाही कसलाच भार!

sakal_logo
By

‘‘चिंगे, अगं थांब अंगावर सोन्याच्या जाडजूड साखळ्या व प्रत्येक बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घातलेली माणसं बघून कावरी- बावरी होऊ नकोस. आपण कोठल्या श्रीमंतांच्या राज्यात आलो आहोत, असंही तुला क्षणभर वाटेल पण पुण्याच्या शेजारी असणाऱ्या समाविष्ट गावांतील ते मूळ रहिवासी आहेत. त्यांचं गाव महापालिकेत जाण्यापूर्वीच त्यांच्या जमिनींना सोन्याचा भाव आला आणि तेच सोने ते अंगावर घेऊन मिरवत आहेत. लाखो आणि कोट्यवधी रूपयांशिवाय त्यांची भाषा नसते. घरटी एकतरी बिल्डर असावा, असाही त्यांचा नियम असतो.
चिंगे, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्याशी अदबीने बोल. तोदेखील याच गावचा मूळ रहिवासी आहे. मात्र, जमीन विकून आलेला पैसा ऐश-आरामात घालवल्यानंतर त्याच्यावर ही वेळ आली आहे. मात्र, त्याच्याशी बोलल्यानंतर सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, हे तुझ्या लक्षात येईल. ‘आमच्या लहानपणी गाव कसं होतं,’ हे तो तासभर तुला ऐकवेल.
चिंगे, समाविष्ट गावांमध्ये सर्वत्र सिमेंट काँक्रिटचं जंगल उभं राहिलं आहे. अध्ये-मध्ये बेकायदेशीर डोंगर उभे असल्याचे दिसतात. ही बाब अनेकांना खटकते. त्यामुळे येथे जेसीबी, पोकलेन फिरवून, डोंगरांना माणसांत आणण्याचे दिवस-रात्र काम सुरू असते. त्यामुळे काही दिवसांनी डोंगर हा प्रकार वस्तुसंग्रहालयातच पहायला मिळेल.
चिंगे, अगं समोर नीट बघून चाल. ही गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी कोणीही कशाही बिल्डिंग बांधल्या आहेत. त्यामुळे दोन बिल्डिंगमधून वाट काढत पुढे जाणे कसरतीचे आहे. पन्नास फूट लांब सरळ रस्ता दिसत असला तरी पुढे एखादी बिल्डिंग आल्याने, तिला वळसा घालून रस्ता चालू होतो, हे लक्षात घे. एका फ्लॅटमधील एखादी व्यक्ती शेजारच्या फ्लॅटमधील किचनमध्ये काय चाललंय, याचा अंदाज घेऊ शकते व खिडकीतून हात घालून, भांडे पुढे करत वांग्याची थोडी भाजी द्या, अशी मागणी करू शकते. शेजारधर्म वाढीला लागावा, यासाठीच एवढ्या दाटीवाटीमध्ये बिल्डिंगा बांधल्या आहेत, हे लक्षात घे.
चिंगे, पाण्याची काटकसर कशी करावी, हे पुणे शहराने येथील नागरिकांकडून शिकून घ्यावे. या भागात अजूनही सलग तीन-चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांना टॅंकरद्वारे पाणी पुरवण्याचे पुण्याईचे काम येथील मूळ रहिवासीच करतात. ‘पाण्यासारखा पैसा कमावला’ हा वाक्यप्रचार त्यांच्यापासूनच तयार झाला आहे. महापालिका नियमित पाणी सोडू लागल्यास, त्यांना ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना पाणी पाजून (पक्षी ः पैसे चारून) आठवड्यातून एक-दोनदाच पाणी येईल, याची तजवीज ते करतात, असं बोललं जातं.
येथील नागरिकांकडून महापालिका कर घेत असली तरी ड्रेनेजलाइन, रस्ते, पाणी, आरोग्य आदी सुविधांची जबाबदारी महापालिकेकडे नसते, हे तुला माहिती आहे का? ‘आमचा काय संबंध, त्यांचं त्यांनी पहावे’ अशी भूमिका महापालिकेची असते तर ग्रामपंचायतही हात झटकते. त्यामुळे येथील नागरिकांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
चिंगे, आपल्या भागाचा कधीतरी विकास होईल, या एकाच आशेवर या भागातील मंडळी आहेत. उपोषणे आणि आंदोलने करूनही ती वैतागून गेली आहेत. त्यामुळे आपण फक्त त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. बाकी ते आणि त्यांचं नशीब!