
मराठी प्रकाशक परिषद आक्रमक
पुणे, ता. १३ ः वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात प्रकाशकांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीची गंभीर दखल मराठी प्रकाशक परिषदेने घेतली आहे. साहित्य संमेलनात वारंवार प्रकाशकांना सापत्न वागणूक मिळत असून प्रत्येक संमेलनात ग्रंथ प्रदर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांसाठीही त्यांना झगडावे लागत आहे. ही सापत्न वागणूक वेळीच थांबवा, अन्यथा पुढील संमेलनात मुख्य मांडवात प्रकाशक निषेध नोंदवतील, असा इशारा परिषदेने साहित्य महामंडळाला दिला आहे.
मराठी प्रकाशक परिषदेने सोमवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबतचे पत्रही परिषदेने अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना पाठवले आहे. याप्रसंगी परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष अरविंद पाटकर, संचालक सु. वा. जोशी आदी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘वर्धा येथील संमेलनात ग्रंथ प्रदर्शनात प्रत्येक गाळे धारकांकडून सात हजार रुपये आयोजकांनी घेतले. कापडाने झाकलेले स्टॉल, दुपारचे कडकडीत ऊन आणि रात्रीची कुडकुडणारी थंडी या दोन्हीचा मारा सहन करत त्यांनी पुस्तक विक्री केली. त्यांना पाणी विकत घ्यावे लागले. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय होती. भोजनाची योग्य व्यवस्था, निवास व्यवस्था नाही. गेल्या काही संमेलनांपासून हा सिलसिला कायम आहे. साहित्य संमेलन हे फक्त लेखकांचे असते, अशी एक चुकीची भावना महामंडळाने करून घेतलेली दिसते. हे उद्वेगजनक आहे. त्यामुळे प्रकाशकांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा निषेध नोंदवणारे पत्र महामंडळाला पाठवले आहे.’’
याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
प्रकाशक परिषदेच्या मागण्या
- संमेलनात लेखकाला जो मानसन्मान दिला जातो, तोच प्रकाशकांनाही मिळावा
- साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीत प्रकाशकांना सहभागी करून घ्यावे
- संमेलनाच्या सर्व समित्यांमध्ये प्रकाशक, विक्रेते यांचा समावेश असावा
- महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत प्रकाशकांचे प्रतिनिधी सामावून घेण्यात यावे
- ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलचे भाडे, स्टॉल उभारणी, रचना, मंडप यासाठी प्रकाशकांच्या सूचनांचा आदर करावा
संमेलनाचे आयोजक प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांकडून भाडे घेतात. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविणे, ही आयोजकांची जबाबदारी असते. संमेलनासाठी सरकार आता दोन कोटीचे अनुदान देत आहे. ही रक्कम फक्त साहित्यिक आणि त्यांच्या मंडपासाठी असते की एकूण साहित्य संमेलनासाठी असते, याचा खुलासा महामंडळ आणि आयोजक संस्थेने करावा.
- अरविंद पाटकर, उपाध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद
प्रकाशक संघाचेही पत्र
ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी काही सूचना करणारे पत्र अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघानेही साहित्य महामंडळाला पाठवले आहे. गाळ्यांचे भाडे कमी करून त्यांची संख्या वाढवणे, गाळ्यांची रचना बंद मंडपात करावी, प्रत्येक गाळ्यामागे दोन व्यक्तींची व्यवस्था करावी, गाळेधारकांसाठी स्वच्छ पिण्याची पाण्याची, स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, ग्रंथ प्रदर्शनातील समितीत प्रकाशक संघाचा प्रतिनिधी घ्यावा, आदी सूचनांचा यात समावेश आहे. संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे व उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.