‘इंटरसिटी’ला उशीर अन् प्रवाशांची धावाधाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंटरसिटी’ला उशीर अन् प्रवाशांची धावाधाव
‘इंटरसिटी’ला उशीर अन् प्रवाशांची धावाधाव

‘इंटरसिटी’ला उशीर अन् प्रवाशांची धावाधाव

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः सोलापूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसला पुण्यात येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे या गाडीने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. अवघ्या चार ते पाच मिनिटात चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांची रेल्वे चुकत आहे. तर दुसरीकडे फलाट क्रमांक सहावर असलेल्या अरुंद पादचारीच्या जिनामुळे प्रवासी जिन्यावरच अडकून पडत आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सोलापूर - पुणे इंटरसिटी हीच पुणे - मुंबई दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेस म्हणून धावते. मागील काही दिवसांपासून या रेल्वेला पुणे स्थानकांवर पोहोचण्यास २० ते २५ मिनिटांचा उशीर होत आहे. सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता पुणे स्थानकावर पोचणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ही रेल्वे पुण्याला ६ वाजून २२ मिनिटांनी तर कधी ६ वाजून २५ मिनिटांनी दाखल होत आहे. तर हीच रेल्वे पुण्याहून इंद्रायणी एक्स्प्रेस म्हणून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटते. प्रवाशांना डब्यांत चढण्यास अवघे ५ ते ८ मिनिटांचा अवधी मिळतो. याच वेळेत डब्यातून उतरणाऱ्या प्रवाशांची व चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. यात अनेकांना डब्यांत चढता न आल्याने रेल्वे चुकत आहे. रेल्वेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर - पुणे इंटरसिटीला उशीर होत असल्याचा फटका पुण्याच्या प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रशासनाने गाडीला उशीर केला तर त्याच्या थांब्याच्या वेळेत देखील वाढ केली पाहिजे. अवघ्या पाच मिनिटात हजार-बाराशे प्रवाशांना आपल्या सामानासह प्रवेश मिळविणे अशक्य आहे. रेल्वे प्रशासनाने याचा विचार करणे गरजेचे आहे.
- नितीन परमार, माजी सदस्य, झोनल रेल्वे सल्लागार समिती

तांत्रिक कारणांमुळे रेल्वेला उशीर झाला असेल. प्रवाशांना गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न करू.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे