
‘व्हॅलेन्टाइन्स डे’चे निमित्त साधत ४४ जणांचे विवाह
पुणे, ता. १४ : व्हॅलेन्टाइन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. अशा या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीचे निमित्त साधत पुण्यातील ४४ प्रेमीयुगुलांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली. दरवर्षी हा मुहूर्त निवडून विवाह बंधनात अडकण्याचे प्रमाण वाढत आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो. हा मुहूर्त साधत विवाह करण्यास प्रेमीयुगल प्राधान्य देतात. पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यामध्ये जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहावेळी किचकट प्रक्रियाही नसल्याने नोंदणी करून विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. आजच्या दिवसाचा मुहूर्त गाठण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयाकडे यापूर्वीच चाळीस युगलांनी पूर्वनोंदणी करून ठेवली होती. आज त्यामध्ये आणखी चार जणांनी हा मुहूर्त साधल्याने ही संख्या ४४ वर गेली. दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली होती.