
शैक्षणिक वेळापत्रकाची वेळ हुकली!
पुणे, ता. १५ ः कोरोनानंतर वर्ष उलटून गेले तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक ‘अप्रगत’ स्थितीत असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी सत्राच्या अर्थात ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यांतील परीक्षा मार्चपर्यंत लांबल्या आहेत. शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी परीक्षा विभागासह विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थी संघटना अपयशी ठरल्या आहेत.
कोरोनामुळे २०१९ ते २०२२ पर्यंतचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. तब्बल तीन ते चार महिन्यांच्या पडलेला फरक एक वर्षानंतरही विद्यापीठाला मिटविता आलेला नाही. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे थेट नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षा मार्च २०२३ पर्यंत लांबल्या आहेत. पर्यायाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांतही हाच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनातील समन्वयाचा अभाव, महाविद्यालये आणि विद्यार्थी संघटनांची बोटचेपी भूमिकांमुळे यंदाही सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जाण्याची दाट शक्यता आहे. उशिरा लागणारे निकाल पुढील प्रवेश प्रक्रियेवर दूरगामी परिणाम करणार असून, अनेक विद्यार्थ्यांच्या संधी हुकण्याची शक्यता आहे. तेंव्हा वेळीच जागे होत सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ः मार्च-एप्रिल २०२२
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ः फेब्रुवारी-मार्च २०२३
परीक्षा लांबण्याची कारणे
- प्रत्येक पेपरला दोन दिवस गॅप देण्याची भूमिका
- परीक्षा विभागासह महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव
- पेपर तपासणीसाठी अपुरे मनुष्यबळ
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचाही परीक्षेवर विपरीत परिणाम
- काही महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण वेळेवर भरले जात नाही
काय झाला परिणाम?
- कोरोनानंतरही एक वर्षाने शैक्षणिक दर्जा सूमार राहणार
- अभ्यासक्रमांच्या सम सत्रांचा (उन्हाळी) शिकविण्याचा कालावधी कमी होईल
- कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम शिकविण्याचे प्राध्यापकांसमोर आव्हान
- प्रात्यक्षिके, महाविद्यालयांतील विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका बसणार
- पुढील सत्राच्या परीक्षा लांबण्याची शक्यता, परिणामी पुढील वर्षाच्या प्रवेशाला फटका
विद्यापीठाच्या अधिकार मंडळांकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक वर्षभरानंतरही पूर्ववत झाले नाही. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेले प्रथम वर्षाची हिवाळी परीक्षा परीक्षा पाच ते सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर होत आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनाचा थेट फटका विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही बसत आहे.
- डॉ. के. एल. गिरमकर,अध्यक्ष, एसफुक्टो
परीक्षा विभाग प्रशासन म्हणून सर्व सकारात्मक सूचनांचे नेहमीच स्वागत करते. शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचेही सहकार्य आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्या जातात. त्यामुळे निकाल उशिरा लागतात आणि नवीन ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येतात. गेल्या वर्षभरात परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर निकाल व पदवी
प्रमाणपत्रे मिळाली नसल्यामुळे प्रवेश रद्द करावे लागले आहेत. परीक्षा विभाग व विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक वेळापत्राची योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे.
- राहुल ससाणे, सदस्य, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
आकडे बोलतात
- विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये : ७०५
- परीक्षा देणारे विद्यार्थी : ६,५०,००० (अंदाजे)
- अभ्यासक्रमांची संख्या : २२४
- प्रश्नपत्रिकांची संख्या : जवळपास ५,०००
- निकाल कधी लागणे अपेक्षित : परीक्षेनंतर ३० ते ४५ दिवसांत
- पेपर तपासणी सुरू कधी होते : संबंधित विषयाचा पेपर झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून
-------------