Shiv Jayanti 2023 : शिवकाळाची सफर घडवण्यासाठी ‘शिवसृष्टी’ सज्ज

Shiv Jayanti 2023 : शिवकाळाची सफर घडवण्यासाठी ‘शिवसृष्टी’ सज्ज

शिवजयंतीनिमित्त रविवारी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
Published on

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवकाळाची अद्‍भुत सफर घडवणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तृत्त्व दर्शवणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे, ‘सरकारवाड्या’चे काम पूर्ण झाले आहे. येत्या रविवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर हा सरकारवाडा सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला होईल.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी विश्वस्त विनीत कुबेर, अरविंद खळदकर, सुधीर मुतालिक, श्रीनिवास वीरकर आणि ‘शिवसृष्टी’चे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.
२१ एकर परिसरात असलेली ही ‘शिवसृष्टी’ एकूण चार टप्प्यांत उभारण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा खर्च साधारण ४३८ कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित टप्प्यांचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. येथे भेट देण्यासाठी सामान्य नागरिकांना ऑनलाइन नोंदणीद्वारे तिकीट आरक्षित करता येईल, असे कदम यांनी सांगितले.

‘सरकारवाडा’मध्ये अनुभवता येणाऱ्या गोष्टी
- भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह
- देवगिरी, शिवनेरी, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आदी किल्ल्यांची सफर घडवणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग
- शिवछत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’
- महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन
- महाराजांच्या आग्रा सुटकेवरील विशेष शो
- मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभूती

तंत्रज्ञानाच्या वापरातून जिवंत अनुभव
शिवसृष्टीच्या प्रत्येक भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून शिवकाळाचा जिवंत अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी होलोग्राफी, ॲनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग आदी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला.

गड-किल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्यामागे एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मॅपिंग केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जणूकाही आपल्याशी बोलत आहेत, असा आभास निर्माण करणारा एक आठ मिनिटांची चित्रफीत तयार करण्यात आली आहे. महाराजांच्या जगदंबा तलवारीच्या प्रतिकृतीसह शिवकालीन नाणी, शस्त्रात्रे, राजचिन्हे आदींचीही प्रतिकृती येथे पाहायला मिळते.

शिवसृष्टीचे नियोजन
‘शिवसृष्टी’ हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारा आशियातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत त्याला ‘मेगा टुरिझम प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता मिळाली आहे. किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरु केलेली चलने, राजमुद्रा यांबरोबरच अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com