‘काजव्यांचा गाव’ने गाठली शंभरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘काजव्यांचा गाव’ने गाठली शंभरी
‘काजव्यांचा गाव’ने गाठली शंभरी

‘काजव्यांचा गाव’ने गाठली शंभरी

sakal_logo
By

महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ ः एखाद्या व्यावसायिक नाटकांचे शंभरच काय, तर पाचशे व हजार प्रयोग होण्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु व्यावसायिक गणितांची आखणी न केलेल्या एखाद्या प्रायोगिक नाटकाने शंभर प्रयोगांचा टप्पा गाठणे, हा अतिशय दुर्मीळ योग. प्रदीप वैद्य प्रस्तुत ‘काजव्यांचा गाव’ या दोन अंकी मराठी नाटकाने हा दुर्मीळ योग साधला आहे.
या नाटकाचा पहिला प्रयोग पाच वर्षांपूर्वी म्हणजे १२ जानेवारी २०१८ ला पुणे नाट्यसत्ताक महोत्सवात सादर झाला होता. मार्च २०२० पर्यंत नाटकाचे ६० प्रयोग झाले. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे मात्र प्रयोगांमध्ये खंड पडला होता. या दोन वर्षांच्या कालावधीत अनेक कलाकार इतर गावी स्थलांतरित झाले होते, तसेच इतर काही कामांमध्ये गुंतले होते. या कलाकारांच्या जागी नव्या कलाकारांची निवड करून कोरोनापश्चात नाटकाचे पुन्हा नव्या दमाने प्रयोग सुरू झाले. आता शनिवारी (ता. १८) सादर होणाऱ्या शतक महोत्सवी प्रयोगाद्वारे या नाटकाच्या नावे ऐतिहासिक नोंद होईल.
या नाटकाची निर्मिती एक्स्प्रेशन लॅब आणि रंगविशेष यांची आहे. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा सर्व बाजू प्रदीप वैद्य यांनी आणि वेशभूषा व मंचवस्तू या बाजू स्मिता तावरे यांनी सांभाळल्या आहेत. नाटकातील रूपाली भावे, आशिष वझे, समीर जोशी या कलाकारांनी सर्व शंभर प्रयोगात भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय नाटकातील चौदा पात्रे विविध प्रयोगांमध्ये सुमारे चाळीस कलाकारांनी साकारली आहेत. या नाटकाने आजवर अनेक महत्त्वाचे पुरस्कारही आपल्या नावे केले आहेत. यामध्ये ‘झी नाट्यगौरव पुरस्कार’, अमेरिकेतील ‘एक नंबर’ नाटक पुरस्कार’ आदींचा समावेश आहे.

विलक्षण नाट्यानुभव देणारे नाटक
कोकणातील एका छोट्याशा गावातील दीक्षित कुटुंबाभोवती या नाटकाचे कथानक फिरते. आजीच्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त कुटुंबातील सगळे गावी एकत्र येतात. मात्र, या आनंदसोहळ्याला माणसांतील हेवेदाव्यांमुळे वेगळेच वळण मिळते. कथानक पुढे जाताना नातेसंबंध, जीवनविषयक दृष्टी याविषयी हे नाटक भाष्य करते. समीपनाट्य या प्रकारात या नाटकाची हाताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक विलक्षण नाट्यानुभव याद्वारे मिळतो.

कोणत्याही नाटकाची केवळ निर्मिती नाही, तर त्या नाटकाचे दीर्घकाळ प्रयोग होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. या नाटकात चौदा भूमिका असून, जवळपास चाळीस कलाकारांच्या संचासह त्याचे आम्ही प्रयोग केले. कलाकारांची नाटकावर निष्ठा असेल, तर काय साध्य होऊ शकते, याचे हे नाटक म्हणजे आदर्श उदाहरण आहे.
- प्रदीप वैद्य, लेखक-दिग्दर्शक