जोखमीच्या कामांसाठी ‘वायू ड्रोन’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोखमीच्या कामांसाठी ‘वायू ड्रोन’!
जोखमीच्या कामांसाठी ‘वायू ड्रोन’!

जोखमीच्या कामांसाठी ‘वायू ड्रोन’!

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः संरक्षण क्षेत्रात सर्व्हेलन्स, मॅपिंग, पाळत ठेवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेत मनुष्यबळाचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे कार्य जोखमीचे असताना यात जीवितहानी देखील होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेतून (एनसीसी) प्रशिक्षण घेतलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने मानवरहित हवाई वाहनांची (यूएव्ही) निर्मिती करणारे स्टार्टअप उभारले आहे. ‘वायू ड्रोन टेक्नॉलॉजीस’ (Vayu Drone Technologies) असे या स्टार्टअपचे नाव असून नुकतेच बंगळूर येथे पार पडलेल्या १४ व्या एरो इंडियामधील प्रदर्शनात या स्टार्टअपने सहभाग घेतला होता.
पी. व्ही. श्रीनाथ असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वेगवेगळ्या यूएव्हीची मित्र देशांतील सशस्त्र दलांच्या प्रमुखांनीही पाहणी केली आहे. अलीकडे सीमावर्ती भागात ड्रोनच्या हालचाली वाढल्या असून देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन तंत्रज्ञनाचा वापर केला जात आहे. केवळ संरक्षणातच नाही तर आता ड्रोन तंत्रज्ञान कृषी, शासकीय कामांसह विविध क्षेत्रात वापरले जात आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत श्रीनाथ याने या स्टार्टअपच्या माध्यमातून सशस्त्र दलांसह वेगवेगळ्‍या क्षेत्रांना सेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी त्याने ‘वायू-एम’ या मल्टीपर्पज ड्रोनची निर्मिती केली आहे.
दरम्यान या ‘वायू-एम’ला परदेशातील संरक्षण अधिकारी तसेच उद्योगाद्वारे ही कौतुकाची थाप मिळत आहे. या स्टार्टअपने आतापर्यंत २७ हून अधिक शासकीय प्रकल्पांसाठी काम केले आहे. त्यात सुरक्षा, कृषी, खाणकाम, पायाभूत सुविधा, शहर नियोजन, आपत्ती व्यवस्थापन लॉजिस्टिक्स डिलिव्हरी, हवामानाचा अंदाज आदींचा समावेश आहे.
याबाबत श्रीनाथ याने सांगितले, ‘‘पदवीचे शिक्षण घेत असताना सोबत ‘एनसीसी’च्या एअर विंगमध्ये दाखल झालो. त्यामुळे हवाई दल आणि विमाने याचे आकर्षण वाढू लागले. त्यात एनसीसी दरम्यान मायक्रोलाइट एअरक्राफ्ट उडविण्याची संधीही मिळाली. एनसीसी पूर्ण झाल्यावर एरो मॉडलिंगची आवड निर्माण झाली. मग हळूहळू ड्रोनच्या निर्मितीवर काम करण्यास सुरवात केली. यासाठी हवाई दलातील एका अधिकाऱ्याने ही मदत केली. संरक्षण, कृषी, नागरी प्रकल्प, शासनाचे प्रकल्प अशा विविध क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हे वेगवेगळे ड्रोन साकारले. त्यानुसार विविध ड्रोनसाठी पेलोड क्षमता ही ८ ते २० किलोग्रॅम इतकी आहे.’’

‘वायू-एम’चे वैशिष्ट्ये
- हे यूएव्ही फोल्डेबल असल्याने यास हाताळणे सोपे
- कोठेही सहजपणे घेऊन जाणे शक्य
- कमी पेलोडसह ३० मिनिटांहून अधिक काळ उडण्याची क्षमता
- तर संपूर्ण पेलोडसह हे ३० मिनिटे उडण्यास सक्षम आहे
- १५ किलोमीटरपेक्षा जास्त पर्यंत प्रवास करू शकतो
- ८ किलोग्रॅमपर्यंतची पेलोड क्षमता

वायू-एम ड्रोनच्‍या माध्यमातून पाळत ठेवणे सोपे असून सर्वहिलेन्स आणि उंच शिखरावरील मदतकार्यासाठी याचा वापर सैन्यदलाद्वारे केला जाऊ शकतो. सध्या या ड्रोनसाठी भारतीय सैन्यदलाने आपली पसंती दर्शवली आहे. लवकरच यासाठी चर्चा करण्यात येणार असून त्यांना याचे डेमो देण्यात येणार आहे.
- पी. व्ही. श्रीनाथ, वायू ड्रोन टेक्नॉलॉजीस