
पंचमदा-रेहमानच्या गीतांनी भरला रंग
पुणे, ता. २० ः आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा हे काळाच्या पुढचा विचार करणारे आणि ए. आर. रेहमान म्हणजे काळाचे बंधन नसलेले संगीतकार. या दोन संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली आणि रसिकांच्या मनात आजही घर करून असलेल्या अनेक अजरामर गीतांवर पुणेकरांनी ताल धरला. निमित्त होते, ‘लव्हेबल ए.आर.-आर.डी.’ या कार्यक्रमाचे.
व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून सूरपालवी, सिनेमा गली आणि पूना गेस्ट हाऊस यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर.डी. बर्मन आणि ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेली सत्तर आणि नव्वदच्या दशकातील गाजलेली चित्रपट गीते यावेळी सादर करण्यात आली. ‘हमे तुमसे प्यार कितना’, ‘आवारा भवरे’, ‘बचना ए हसिनो’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘हम्मा हम्मा’, ‘एक चतुर नार’ आदी गीतांचा यात समावेश होता. अनिल करमरकर यांनी सॅक्सोफोनवर सादर केलेल्या ‘गुलाबी आँखे’ या गीताने मैफिलीचा कळस गाठला.
या कार्यक्रमाचे आयोजन सिनेमा गलीचे गुरुतत्त सोनसुरकर व वृषाली अंबर्डेकर यांनी केले होते. संकल्पना आणि दिग्दर्शन संजय हिवराळे यांचे होते. पल्लवी पत्की-ढोले, रवींद्र खोमणे, कल्याणी देशपांडे, रफी हबीब आणि संतोष गायकवाड यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन किशोर सरपोतदार यांनी केले. अजित कुमठेकर कार्यक्रमाचे समन्वयक होते.