कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने दीड लाख लशींचा साठा राज्यात शिल्लक आहे. दिवसाला जेमतेम पाचशे जण सध्या लस घेत असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही नोंदविण्यात आले.
राज्यात गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे. मार्चअखेरपर्यंत हा लशीची मुदत आहे. त्यानंतर ही लस वापरता येणार नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. भविष्यातील कोरोनाच्या संभाव्य उद्रेकाचा विचार करून कोव्हिशिल्ड लशीच्या डोसची मागणी केंद्राकडे नोंदविण्यात आली आहे. लवकरच हे डोस राज्याला मिळतील. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय राज्याने घेतला असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

आकडे बोलतात...
- राज्यात संसर्गाचा दर ९.४२ टक्के आहे
- राज्यभरात आतापर्यंत आठ कोटी ६३ लाख ८५ हजार ८२० नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत
- त्यापैकी ८१ लाख ३७ हजार ४०९ रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले
- गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्गाचा दर आणि मृत्यू दर सातत्याने कमी
- त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला नागरिक आता प्राधान्य देत नाहीत

कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आल्यानंतर पुणेकरांनी लसीकरण केंद्रांवर गेल्या वर्षी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर बूस्टर घेण्यासाठी जुलैमध्ये पुणेकरांची मागणी वाढली होती. आता लसीच्या मागणीत वेगाने कमी होत आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

राज्यात लसीचा मुबलक पुरवठा आहे. लसीकरणाचा वेग मात्र सध्या कमी झाला आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस आवर्जून घ्यावी. त्यातून कोरोनाच्या उपचारातील गुंतागुंत निश्चित टाळता येते. लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. घरातच त्याच्यावर यशस्वी उपचार करता येतात. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस किंवा बूस्टर डोस राहिलेल्या नागरिकांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन तो तातडीने घ्यावा.
- डॉ. सचिन देसाई, सहायक संचालक (लसीकरण), सार्वजनिक आरोग्य खाते