
भाजपकडून शिवाजी महाराजांचा अवमान
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे, देशाचे दैवत, प्रेरणास्थान आहेत. भाजप सातत्याने त्यांचा अवमान करत आहे. शिवाजी महाराज विश्वासघात करणाऱ्यांचा कडेलोट करत. त्याच धर्तीवर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदार मतदानाद्वारे भाजपचा कडेलोट करतील, असे विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी व्यक्त केले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सकल मराठा समाज मेळाव्यात पटोले बोलत होते. या वेळी माजी मंत्री विश्वजीत कदम, सुनील केदार, खासदार ॲड. वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, विशाल धनवडे, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, बाळासाहेब अमराळे उपस्थित होते.
भाजपच्या नेत्यांप्रमाणेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भाजप सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवायचा होता. म्हणूनच त्यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राचा राज्यपाल केले, अशी टीकाही करत पटोले म्हणाले, ‘‘कसब्याचा इतिहास मोठा गौरवशाली आहे. कसब्यातूनच शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य सुरू केले. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, देशभक्त केशवराव जेधे आदींचे वास्तव्य इथेच होते. कसब्यातूनच देशातील परिवर्तनाला सुरुवात झाली. तसेच या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून देशात परिवर्तन घडणार असून रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी होतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय मी बदला घेतला, असे म्हणतात. तसेच जनताही कसब्यात बदला घेईल, असे पटोले म्हणाले.
मराठा समाजाची दिशाभूल!
भाजप मराठा समाजाला मूर्ख समजतो. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही आयोग स्थापन न करून त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली. मात्र, आता मराठा समाज जागा झाला असून मतपेटीद्वारे आपला राग व्यक्त करेल, असेही पटोले म्हणाले.