
अनावश्यक, बेकायदा गतिरोधक हटणार पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण : जूनपर्यंत होणार काम; पूर्ण नागरिकांचा त्रास वाचणार
पुणे, ता. २४ : शहरातील कोणत्याही भागातील अंतर्गत रस्त्यांवर भलेमोठे डांबराचे डोंगर उभे करून तेथे अनावश्यक व बेकायदा गतिरोधक तयार करून वाहनांना अटकाव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा अनावश्यक, बेकायदा व धोकादायक गतिरोधकांमुळे अपघात घडण्याबरोबरच नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडण्याचे प्रकार घडत होते. या प्रकाराची महापालिका प्रशासनाने अखेर गंभीर दखल घेत, असे बेकायदा व अनावश्यक गतिरोधक हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता गतिरोधकांचे सर्वेक्षण सुरू केले असून, जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
शहरातील किंवा ग्रामीण भागातील रस्ते तयार करताना इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) नियमांनुसार रस्ते, पदपथ, गतिरोधक तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून महत्त्वाच्या व आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधकही तयार केले जातात. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील अंतर्गत भागांत प्रत्येक रस्त्यांवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक तयार केले आहेत. स्थानिकांकडूनही अनेकदा असे गतिरोधक तयार केले जात आहेत. हा प्रकार उपनगरांमध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला होता.
महापालिकेच्या हद्दीतील व महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील गतिरोधक, पदपथांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्या रस्ते विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शहरात किती गतिरोधक आहेत, त्यांची शास्त्रीय पद्धतीने बांधणी झाली आहे का? त्यामुळे नेमक्या काय अडचणी निर्माण होत आहेत. याची माहिती या सर्वेक्षणातून घेतली जाणार आहे.
गतिरोधकांबाबत महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. त्यानुसार, अनावश्यक व बेकायदा गतिरोधकांचे सर्वेक्षण केले जात आहे. जूनपर्यंत हे काम संपेल, त्यानंतर ते गतिरोधक काढून रस्ते पूर्ववत केले जातील. त्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास, गंभीर अपघात कमी होतील. तसेच पावसाळ्यातही गैरसोय होणार नाही.
- व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका
उपनगरांमध्ये अंतर्गत भागात मोठे उंचवटे असणारे गतिरोधक तयार केले जातात. नवीन वाहनचालकांचे अपघात होतात, तर नेहमी त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना कंबरेचे, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे असे अनावश्यक, बेकायदा गतिरोधक तत्काळ काढून टाकावेत.
- गौतम चव्हाण, नोकरदार
अनावश्यक व बेकायदा गतिरोधकांचे धोके
- वाहनचालकांच्या लक्षात गतिरोधक येत नसल्याने घडणारे अपघात
- वाहनांची गती मंदावून वाहतूक कोंडीचा प्रकार घडणे
- गतिरोधक मोठ्या प्रमाणात उंच केल्याने कंबर, मणक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता
- पावसाचे पाणी आडून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार
- गतिरोधकांमुळे खड्डे तयार होऊन रस्ते खराब होणे
शहरातील रस्ते
शहरातील रस्त्यांची लांबी - १४०० किलोमीटर
नव्याने समाविष्ट गावातील रस्त्यांची लांबी - ३०० किलोमीटर