
नेरकर लेख
मराठी काव्य समृद्ध करणारे अग्रगण्य कवी, समर्थ नाटककार, कथाकार, जीवननिष्ठांची जपणूक करणारे पुरोगामी विचारवंत, समीक्षक अशा विविध भूमिका वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी यशस्वीपणे साहित्यसृष्टीत निभावल्या. या वात्सल्यमूर्तीचे नाव उच्चारताच विनम्र भावनेने मराठी माणूस नतमस्तक होतो. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जयंतीदिन. त्यानिमित्ताने...
- डॉ. अरविंद नेरकर,
संतसाहित्याचे अभ्यासक
कुसुमाग्रज म्हणजे नव्या-जुन्या लेखकांचे श्रद्धास्थान. १९३२ मध्ये त्यांनी रत्नाकर मासिकात लेखन करायला सुरवात केली. पुण्याच्या विविध दैनिकांत त्यांनी १९४२ पर्यंत काम केले. याचवर्षी त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. जीवनलहिरी, किनारा, मराठी माती, स्वगत, वादळवेल हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात,’ ‘क्रांतीचा जयजयकार’, ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’, ‘गाभारा’ ‘कणा’ या त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत. त्यांच्या अनेक कविता वाचकांच्या तोंडपाठ आहेत. एवढी लोकप्रियता त्यांच्या कवितांनी मिळवली आहे.
कवितेबरोबरच त्यांच्या नाटकांनीही अमाप लोकप्रियता मिळवली. ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘नटसम्राट’ आदी नाटके लिहिली. त्यापैकी ‘नटसम्राट’ या नाटकाने इतिहास घडवला आहे. या नाटकाने त्यांना घराघरांत पोहोचले.
कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९८६ मध्ये डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले तर १९८८ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले. हा गौरव प्राप्त करणारे ते दुसरे मराठी लेखक ठरले. त्यांच्याआधी वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. कुसुमाग्रज या वात्सल्यमूर्तीच्या संपर्कात मी शालेय विद्यार्थी असल्यापासून आहे. हा संपर्क नाशिकला २७ फेब्रुवारी १९९९ ला झालेल्या अखेरच्या भेटीपर्यंत कायम राहिला. सुमारे २५ ते ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात तात्यासाहेबांच्या भेटीचे सुवर्णक्षण माझ्या आठवणींच्या कोंदणात मी मनापासून जपून ठेवले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याला एक वर्ष राहून वृत्तपत्रविद्या पदवी शिक्षण घेण्यास वडिलांचा विरोध होता. पण तात्यांच्या संमतीमुळे वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला असे. तात्या हे वडिलांचेही श्रद्धास्थान होते. त्यामुळे तात्यांना भेटायला मी वडिलांबरोबर जात असे. शिक्षण व विविध ठिकाणी नोकरी करताना त्यांचे आशीर्वाद मला सातत्याने मिळाले आहेत. मला डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले होते.
तात्यासाहेबांची शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. २७ फेब्रुवारी हा तात्यांचा वाढदिवस! तात्यांच्या भेटीसाठी मी आणि माझे वडील पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या निवासस्थानी आलो. आतल्या खोलीत तात्या बिछान्यावर झोपले होते. मी म्हणालो, ‘‘तात्या आता बरं वाटतंय ना.’’ तात्यांनी काही न बोलता वर हात केला. ‘तात्यासाहेबांना पूर्ण लवकर बरे वाटू दे’, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करू लागलो. १० दिवसांनी म्हणजे १० मार्च १९९९ रोजी तात्यासाहेबांच्या जीवन प्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला.