
पोटनिवडणुकीतही मतदारयाद्यांतील घोळ कायम अनेकांची नावे गायब, तर काहींचे नाव घरापासून लांब असणाऱ्या केंद्रात
पुणे, ता. २६ : कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मतदारयाद्यांतील घोळ समोर आला आहे. मतदारयाद्या विचित्र पद्धतीने फोडल्यामुळे आणि नव्या मतदारांची नावे पुरवणी यादीत आल्याने एकाच कुटुंबातील मतदारांची मतदान केंद्रे बदलली, काहींची मतदान केंद्रे घरापासून लांब गेली, तर अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाली. तसेच घरपोच मतदान चिठ्ठीचे (व्होटर स्लिप) शंभर टक्के वाटप न झाल्याने त्याचा त्रास मतदारांना सहन करावा लागला.
अनेक मतदान केंद्रांवर नावे शोधण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून दरवेळेप्रमाणे यंदाही विविध उपक्रम हाती घेतले होते. प्रत्येक मतदाराला आधी मतदार चिठ्ठी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्र, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदान खोली क्रमांक आदी तपशील मिळणे सोपे व्हावे, हा त्यामागे हेतू होता. मात्र, मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मतदारसंघातील अनेक भागांत मतदारांपर्यंत या चिठ्ठ्याच्या पोचल्या नसल्याचे मतदार केंद्रांना भेट दिल्यानंतर दिसून आले.
दरम्यान, जानेवारीपूर्वी नव्याने मतदार झालेल्या अनेक मतदारांना मतदान केंद्र शोधताना अडचण आली. पुरवणी यादीत त्यांची नावे आल्याने कुटुंबाचे मतदान एका केंद्रावर तर नवमतदारांचे नाव दुसऱ्या केंद्रावर आल्याने नवमतदारांना मतदान केंद्र शोधताना कसरत करावी लागत होती. तसेच, वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या काही मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
टपाली मतदानाची माहितीच नाही
मतदान केंद्रांवर अनेक ८० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार मतदानासाठी आले होते. या मतदारांसाठी यंदा प्रथमच टपाली मतदानाची सोय करण्यात आली होती. मात्र, या मतदारांच्या घरी प्रशासनाचे लोक टपाली मतदानाचा अर्ज घेऊन गेले नसल्याचे मतदारांनी सांगितले. तसेच टपाली मतदानाची सोय असल्याचे माहितच नसल्याचेही मतदारांनी सांगितले. मात्र ज्येष्ठ मतदार केंद्रांवर आल्यानंतर मात्र त्यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळाले.
गेल्या ४९ वर्षांपासून मी लोकमान्यनगर भागात वास्तव्यास आहे. सन २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा हक्कही बजावला होता. मात्र, यंदा पोटनिवडणुकीसाठी मतदारयादी तपासल्यानंतर माझे नाव नसल्याचे समजले. तरीदेखील नेहमीच्या आणि घराजवळच्या तीन-चार मतदान केंद्रांबाहेर जाऊन मतदारयादी तपासली. व्होटर्स हेल्पलाइन उपयोजन (ॲप), निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ येथेही नाव तपासले. मात्र, नाव नसल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. लोकमान्यनगर, रामबाग कॉलनी परिसरातील किमान २०-२५ जणांची नावे यंदा मतदारयादीत नव्हती.
- श्रीराम ओक, लोकमान्यनगर
गेल्या चार निवडणुकांपासून केळकर रस्त्यावरील कन्या शाळेत मी मतदान करीत होते. पण आज सकाळी त्याच मतदान केंद्रावर मी मतदानासाठी गेले असता, यादीमध्ये माझे नाव नव्हते. आजूबाजूच्या दोन ते तीन केंद्रांवर जाऊन मी चौकशी केली. परंतु तेथेही नाव नसल्याने नाईलाजास्तव मतदान न करताच घरी यावे लागले. मात्र माझ्या पतीचे नाव त्याच केंद्रावरील मतदारयादीमध्ये होते.
- सुवर्णा कुलकर्णी, नारायण पेठ