कोरोनाचे उपचार सामान्यांच्या आवाक्यात

कोरोनाचे उपचार सामान्यांच्या आवाक्यात

पुणे, ता. १ : कोरोनावर कमी खर्चात प्रभावी उपचार करता येतात. त्यातून कोरोनाचा मृत्यूदर निश्चित कमी होतो, या बद्दलचे जगातील पहिले संशोधन पुण्यातील सह्याद्रि रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. त्याची दखल वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात नियतकालिक असलेल्या ‘द लॅन्सेट’ने घेतली आहे.
मायकोफेनोलेट हे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे औषध आहे. अवयव प्रत्यारोपणात ते वापरले जाते. कोरोना झाल्यानंतर हे औषध बंद करण्याचा सल्ला रुग्णाला उद्रेकाच्या सुरवातीला देण्यात येत होता. या औषधाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती, हे त्यामागचे मुख्य कारण होते. या औषधाचा गुणधर्म आणि औषध दिलेल्या कोरोनाच्या रुग्णांची निरीक्षणे या आधारित पहिला शोधनिबंध डॉ. अतुल सजगुरे व डॉ. वासंती सजगुरे यांनी दीड वर्षांपूर्वी मांडला होता. मायकोफेनोलेट हे औषध सुरू असलेले रुग्ण कोरोनातून लवकर बरे होतात, असा निष्कर्ष यातून निघाला. मात्र, हे सर्व रुग्ण मूत्रपिंड विकाराचे होते. त्यांचे हे औषध बंद केले नाही. त्यामुळे ते लवकर बरे झाले. त्या आधारावर या अभ्यासाची कक्षा रुंदावली.

संशोधनावर ‘आयसीएमआर’ची मोहर
रुग्णांवर मायकोफेनोलेट या औषधाच्या परिणामांचे संशोधन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केले. या अभ्यासाची नोंदणी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ‘क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’मध्ये (सीटीआरआय) केली होती. त्यासाठी सह्याद्रि रुग्णालयाच्या ‘एथिक्स कमिटी’ची या अभ्यासाला मान्यता मिळाली.

असे केले संशोधन...
१) कोरोनाचे २१२ रुग्ण संशोधनात सहभागी झाले. त्यापैकी १०६ रुग्णांना कोरोनाच्या इतर औषधांबरोबरच मायकोफेनोलेट औषध दिले.
२) एक गोळी दररोज याप्रमाणे महिनाभर हे औषध दिले. उर्वरित १०६ रुग्णांनी हे औषध घेण्यास नकार दिला.
३) मायकोफेनोलेट औषध घेतलेल्या आणि न घेतलेल्या रुग्णांवर संशोधन केले.

संशोधनात सहभागी तज्ज्ञ
प्रमुख अभ्यासक डॉ. अतुल सजगुरे यांच्याबरोबरच डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. अतुल जोशी, डॉ. वासंती सजगुरे, डॉ. वैशाली पाठक, डॉ. शिल्पा पाठक, डॉ. रशिदा मेलिनकेरी, डॉ. मनोज नाईक, डॉ. सुमीत अग्रवाल, डॉ. मिलिंद राजूरकर, अमेय सजगुरे व डॉ. गिरीश दाते या सहअभ्यासाकांनी संशोधनात सहभाग घेतला. सह्याद्रि रिसर्च विभागाच्या प्रमुख डॉ. दीपा दिवेकर यांचे यात मार्गदर्शन मिळाले.


निष्कर्ष काय निघाला?
- मायकोफेनोलेट औषध घेणारे रुग्ण लवकर बरे झाले.
- औषध घेतलेल्यांमध्ये मृत्यूदर कमी होता. मायकोफेनोलेट औषध घेतलेल्या गटांमधील १०६ पैकी दोघांचा मृत्यू झाला. तर हे औषध न घेतलेल्या गटामध्ये १९ रुग्ण मृत्युमुखी पडले.
- मायकोफेनोलेट औषध घेतलेले रुग्ण लवकर घरी गेले. त्या तुलनेत औषध न घेतलेल्या रुग्णांना बरेच दिवस रुग्णालयात थांबावे लागले.
- कोरोनानंतर फुफ्फुसामध्ये होणारी गुंतागुंतही या औषधाने टाळता येऊ शकते.

संशोधनाचे वैशिष्ट्ये....
डेंगीसह इतर विषाणूजन्य रुग्णांमध्ये मायकोफेनोलेट औषध प्रभावी ठरत असल्याचे संशोधन यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. पण, कोरोनामध्येही हे औषध तितकेच प्रभावी ठरते, हे कोणीही संशोधनातून सिद्ध केले नव्हते. ते पुण्यातील डॉक्टरांनी केले. कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटवर तसेच, इतर विषाणूजन्य साथीच्या उद्रेकात हे औषध उपयुक्त ठरेल, असा दावा या संशोधनात केला आहे.


कमी खर्चात उपचार
रेमडेसिविर, टोसिलिझुमॅप यांसारख्या महागड्या औषधांची मागणी कोरोना उद्रेकात वाढली होती. त्याचा मोठा काळा बाजारही झाला. त्यातून कोरोनाच्या उपचाराचा खर्च वाढला. या पार्श्वभूमिवर मायकोफेनोलेट हे प्रभावी ठरत असल्याचे या संशोधनातून दिसते. गेली ३० वर्षे हे औषध वापरात असून, ते सामान्य रुग्णांना सहज परवडू शकते. याची एक गोळी साधारणतः ४० रुपयांना आहे.

कोरोना उपचारातील गुंतागुंत टाळण्यासाठी, उपचारासाठी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी करणे आणि कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी मायकोफेनोलेट हे औषध प्रभावी ठरले आहे. या औषधाचे कोरोनाबद्दलचे जगातील पहिले संशोधन आहे.
- डॉ. अतुल सजगुरे,
मूत्रपिंडविकार तज्ज्ञ, सह्याद्रि रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com