पुण्याची धाव आता ‘ई-बस’ने

पुण्याची धाव आता ‘ई-बस’ने

पुणे, ता. ३ ः राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १५० ई-बस दाखल होत असून, या सर्व बस पुण्याहून सुटणार आहेत. पहिल्या टप्यात मार्चअखेरीस पुणे ते मुंबईदरम्यान ५० ई-शिवनेरी बस धावणार आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पुण्याहून सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर आदी शहरांसाठी १०० शिवाई बस धावतील. पुण्याहून एकूण १५० बस ई-बस धावणार असून, यात ‘शिवाई’ व ‘शिवनेरी’चा समावेश आहे.
पुणे-मुंबई मार्गावर पहिल्यादांच ‘ई शिवनेरी’ धावणार आहे. त्या दृष्टीने पुण्यात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरचा प्रवास आतापर्यंत शिवशाही, शिवनेरी बसच्या माध्यमातून झाला. आता मात्र तो ई-शिवनेरीच्या माध्यमातून केला जाणार आहे. शिवनेरीचे तिकीट दर जास्त असल्याने ही बस केवळ पुणे ते मुंबई मार्गावर धावते. नवी ई शिवनेरीच्या तिकीट दरात कोणतेही वाढ नसेल. सध्याचाच तिकीट दर असणार आहे. मात्र डिझेलवर धावणाऱ्या शिवनेरीच्या तुलनेत ही बस अधिक चांगली असल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.

चार्जरची संख्या वाढणार
स्वारगेट डेपो व पुणे स्टेशन डेपोमध्ये सध्या पाच चार्जर आहेत. मात्र आता बसची संख्या वाढणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या विद्युत विभागाने चार्जरची संख्या वाढविण्याचेदेखील काम सुरू केले आहे. स्वारगेट डेपोमध्ये २० चार्जर वाढविले जाणार आहेत. त्यामुळे स्वारगेट डेपोतील चार्जरची संख्या २३ होणार आहे. यासाठी विद्युत पुरवठादेखील वाढविला जात आहे. सध्या स्वारगेट डेपोला २२५० किलोवॉटचा पुरवठा होत असून, तो ४ हजार किलोवॉटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या स्टेशनमध्ये १५० व ९० किलोवॉटच्या चार्जरचा समावेश आहे. एक बस चार्ज करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. बस चार्ज झाल्यावर सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत धावेल. चार्जिंग स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे.

पुण्याहून या शहरांत धावणार ‘शिवाई’
सध्या पुण्याहून केवळ नगरसाठी शिवाई धावत आहे. आता मात्र पुण्याहून, ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व सोलापूरसाठी शिवाई धावणार आहे. नाशिक, संभाजीनगर व सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. मार्चअखेरीस ते पूर्ण होईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

एसटीचा पर्यावरणपूरक प्रवास
राज्य परिवहन महामंडळाचा भर आता पर्यावरपूरक बस सुरू करण्यावर आहे. डिझेल बसची संख्या कमी केली जात आहे, तर ई-बससह ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या पुणे-नगर मार्गावर ४ शिवाई धावत आहे, तर सुमारे १५० ई-बस धावणार आहेत. याशिवाय १ हजार बस या सीएनजीवर धावणार आहेत.

पहिल्या टप्प्यात पुण्याहून मुंबईसाठी ५०, तर अन्य शहरांसाठी १०० ई-बस धावतील. ई-बससाठी पुणे हे हब होतेय. डिझेल बसचे ‘सीएनजी’मध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com