सेवा भवन ः समाधान निरपेक्ष सेवेचं!
जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शनिवारी, ४ मार्च रोजी होत आहे. त्या निमित्ताने या प्रकल्पाची ओळख...
- सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा प्रारंभच आपत्ती निवारणाच्या कार्यापासून झाला. महाराष्ट्रात १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्या वेळी महाराष्ट्र दुष्काळ विमोचन समिती म्हणून हे काम सुरू झाले. केलेल्या कामाचा आढावा घेत असताना विचार झाला की, आपत्ती आली तरच काम करायचे का? समाजात अनेक समस्या जाणवतात. त्यावर उत्तर म्हणून प्रत्यक्ष सेवाकार्य सुरू झाली पाहिजेत. या विचारातून ९ फेब्रुवारी १९७३ रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून कामास सुरूवात झाली. १९८९ मध्ये डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या मार्गदर्शनाने सेवाकार्यांना अधिक चालना मिळाली. त्यातूनच जनकल्याण समितीचा विस्तार झाला.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात ‘सेवा भवन’ या नावाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत आहे. राजगुरुनगर, खेड येथील ज्येष्ठ संघस्वयंसेवक कै. नारायणकाका दाते यांनी त्यांच्या इच्छापत्रात पुण्यातील पटवर्धन बागेतील सुमारे ६५०० चौरस फुटांचा भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीला दिला. इच्छापत्राची अंमलबजावणी कै. कृष्णा गुजराथी (व्यास) यांनी केली. संघप्रचारक कै. मुकुंदराव पणशीकरांच्या प्रयत्नांमुळे या सर्व गोष्टी जुळून आल्या. या जागेत ‘सेवा भवन’ या नावाने सेवाप्रकल्प उभा राहावा असे त्यांनीच सुचवले होते. त्यानुसार या ठिकाणी आता सात मजली ‘सेवा भवन’ ही वास्तू उभी राहिली आहे.
रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची उपचारासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यांची पुण्यात राहण्याची सोय नसते, त्यामुळे तात्पुरत्या उपचारासाठी येणारे रुग्ण व दीर्घ काळ उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था अल्पदरात ‘सेवा भवन’ या ठिकाणी करण्यात येणार आहे. अनेक रुग्णांना डायलिसिस करण्याची गरज भासू लागली आहे. चांगल्या मोठ्या रुग्णालयातील असे उपचार करण्यासाठी खर्च अधिक येतो तसेच त्यांची प्रतिक्षायादीही मोठी असते. त्यामुळे सेवाभवनात २० खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी गरजू रुग्णांना अल्पदरात सुविधा उपलब्ध असणार आहेत.
सेवा भवनाच्या परिसरात मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पण सर्वांना हे ज्ञात असतेच असे नाही. अनेक आजारांवर उपचार करणारे, माहिती देणारे तज्ज्ञ डॉक्टरही याच भागात आहेत. एमआरआय, सीटी स्कॅन वगैरे सारख्या आजारांचे निदान करणारी उपकरणेही उपलब्ध आहेत. याबाबत बाहेर गावहून येणाऱ्या रुग्णांना सल्ला देण्याचे कामही या ठिकाणी चालणार आहे. त्यासाठी रुग्णवाहिका, ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची सोयही या ठिकाणी केली आहे.
जनकल्याण समितीद्वारे महाराष्ट्रात २७ प्रकारची १८७० सेवाकार्ये चालवली जातात. या शिवाय नऊ मोठे प्रकल्प म्हणजे सेवाक्षेत्रातील नवविधाभक्तीचे प्रत्यक्ष रूपच म्हणता येईल. त्यात ठाणे, नगर, नाशिक येथील रक्तपेढ्या, पनवेल येथील रूग्णालय, मुंबई येथील ५० सेवा वस्तींत चालणारे वस्ती परिवर्तनाचे कार्य, लातूर येथे ५७० विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय, ७४ दिव्यांग विद्यार्थ्यांचे विकसन केंद्र ‘संवेदना’, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील १२ गावांतील समाज अभिसरणाचे केंद्र, ‘भारतमाता मंदिर’ प्रकल्प आणि आता जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘सेवा भवन’.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.