भांडणाचा गोडवा समेटाचा ओलावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडणाचा गोडवा
समेटाचा ओलावा!
भांडणाचा गोडवा समेटाचा ओलावा!

भांडणाचा गोडवा समेटाचा ओलावा!

sakal_logo
By

‘‘अगं मला सोफ्यावर बसायला जागा दे. एक आख्खा सोफा एकटीने अडवला आहेस. लग्न झाल्यानंतर आपण दोघेही याच सोफ्यावर किती निवांतपणे बसायचो. तरीही एक-दोन फूट जागा शिल्लक राहायची.’’ राहुलने मनीषाला म्हटले.
‘‘मारा. टोमणे मारा. तुम्हाला आणि तुमच्या आईला तेवढी एकच गोष्ट चांगली जमते. लग्नानंतर माझं दोन-चार किलो वजन वाढलं तर किती बोलताय. तरी माझी आई लग्नाआधी नेहमी म्हणायची, ‘‘मनीषा, तुझी सासू दिसतेय तशी वाटत नाही बरं का? मारक्या म्हशीसारखा स्वभाव दिसतोय. खाष्टपणाचे सगळे गुण तिच्यात आहेत आणि तुझा नवरा आता वाटतोय नंदीबैल पण तुझ्यावर कधी शिंगे रोखेल, हे सांगता यायचं नाही. तेव्हा जरा जपून वाग.’’ मनीषाने म्हटले.
‘‘तरीच तुझी आई गावाला आल्यानंतर ‘गुरा- ढोरांची व्यवस्थित काळजी घेत जा’, असं तुला का म्हणायची, ते लक्षात आलं.’’ राहुलने म्हटले.
‘‘तुम्ही उगाचंच सुतावरून स्वर्ग गाठू नका. खरं तर तुम्ही माझ्याशी सारखं भांडण करता ना, त्यामुळे तुम्हाला सोफ्यावरच काय नरकात पण जागा मिळणार नाही.’’ मनीषाने म्हटले.
‘‘मला काही हौस नाही, दरवेळी तुझ्यामागं मागं यायची.’’ राहुलने म्हटले.
‘‘काय म्हणालात? म्हणजे मी नरकात जाणार आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का?’’ मनीषाने रागाने म्हटले.
‘‘मी कोठं तसं म्हटलंय. तू देखील सुतावरून स्वर्ग गाठू नकोस आणि खरंच तू स्वर्गात जाणार असशील तर मी आपला नरकातच बरा आहे. तिथे तुझ्या आईसकट सगळे नातेवाईक तरी भेटतील.’’ मोठ्याने हसत राहुलने म्हटले.
‘‘मी तुम्हाला हजारवेळा सांगितलं असेल, आपल्या भांडणात माझ्या माहेरच्यांना आणायचे नाही म्हणून.’’ असं म्हणून ती पाय आपटीत बेडरूममध्ये गेली. भांडणाच्या नादात आपला नाश्‍ता हुकला आहे, याची जाणीव राहुलला झाली. आता मनीषाला नाश्‍ता करायला सांगणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं होईल. त्यामुळे त्यानेच नाश्‍त्याची तयारी केली. कसाबसा कांदा- टोमॅटो कापला, तिखट व मीठ टाकले. पोहे भिजवून, ते कढईत टाकले. मात्र, सगळे मिश्रण एकजीव झाले. आपण पोहे केलेत की उपीट केलंय, हेच त्याला कळेना. पोह्यांचा एक लगदा त्याने चाकूने कापला व त्याच्या फोडी करून, एक घास त्याने तोंडात घातला. त्यावर ‘आई गं’ असं तो जोरात ओरडला. डोळ्यांतून पाणी आले. ‘‘किती तिखटजाळ झालेत पोहे.’’ असं तो स्वतःशी बोलला. त्यानंतर प्लेट घेऊन, तो बेडरूमध्ये गेला. ‘‘मी तुझ्यासाठी पोहे कम उपीट केलेत.’’ प्लेटमधील पदार्थ पाहिल्यानंतर मनीषाचा राग अनावर झाला.
‘‘तुम्हाला एक काम धड करता येत नाही पण भाव किती खाता?’’ असं ती रागाने म्हणाली.
‘‘मी भाव खात असलो तरी एकटा खात नाही. तुझ्या खाण्याचाही विचार करतो. तुझ्यावरील प्रेमापोटीच मी हा पदार्थ केलाय.’’ राहुलने म्हटले.
‘‘जाऊ द्या. मी करते काहीतरी. तुमचा पदार्थ गुरांना खायला द्या.’’ मनीषाने म्हटले.
‘‘गुरांना? म्हणजे आम्हालाच की.’’ असं म्हणून तो मोठ्याने हसला.
‘‘मिसळ करतेस का? एकदम झणझणीत. कोल्हापुरी तिखट मसाला वापर.’’ राहुलने फर्माईश केली.
‘‘मिसळ झणझणीत होण्यासाठी मीच त्यात शिरते.’’ मनीषाने रागाने म्हटले.
‘‘अगं तसं नको करूस. मग मिसळ गोड होईल.’’ राहुलने मिश्‍कीलपणे म्हटले. त्यावर ती हसली.
‘‘त्यानंतर बिनसाखरेचा चहा कर. फक्त कप तुझ्या ओठांना लाव म्हणजे सगळा गोडवा चहात उतरेल.’’ राहुलने म्हटले.
‘‘तुमचं आपलं काहीतरीच.’’ असं म्हणून ती लाजली व त्याला बिलगली. तिच्या आनंदाश्रूंनी त्याचा खांदा भिजला. थोड्यावेळाने एका सोफ्यावर बसून, एकाच प्लेटमधील मिसळ एकमेकांना ते भरवू लागले.