
बारावी गणिताची फेरपरीक्षा नाही
पुणे, ता. ३ : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारावीच्या गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल होत फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. पेपरफुटी प्रकरणाचा प्राथमिक अहवाल घेतला आहे. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कारवाई निश्चित करण्यात येईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. तसेच हा पेपर पुन्हा न घेण्यावर राज्य मंडळ ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
इयत्ता बारावीच्या विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचा गणिताचा पेपर शुक्रवारी होता. दरम्यान सिंदखेड राजा येथे बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती राज्य मंडळाला कळली. हा पेपर फुटल्याचा स्क्रीन शॉट थोड्या वेळात सर्वत्र पोचला. याबाबत गोसावी म्हणाले, ‘‘हा पेपर सकाळी साडेदहा वाजता फुटल्याचे किंवा व्हायरल झाल्याचे बोलले जात असले, तरीही प्रत्यक्षात संबंधितांच्या मोबाईलवर १० वाजून ५७ मिनिटांनी पेपर आला आहे. या प्रकरणी संबंधित विभागातील गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.’’
पेपरफुटी प्रकरणाचा प्राथमिक अहवाल घेतला असून तेथील सर्वच केंद्र संचालक, उपसंचालक, सहाय्यक परिरक्षक (रनर) यांची तत्काळ बदली केली आहे. त्याशिवाय यापुढे पेपरफुटीचे प्रकार होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोचला नाही’
‘‘सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पेपर बाबत माहिती घेतली असता, हा पेपर अन्य कोणाकडेही आढळून आलेला नाही. तसेच विद्यार्थ्यांना सकाळी साडेदहा वाजताच परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात आला होता. कोणत्याही विद्यार्थ्यांकडे अजून तरी पेपर आढळलेला नाही. त्यामुळे पेपर फुटला, किंवा व्हायरल झाला असला तरीही हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलेला नाही. कारण पेपर व्हायरल होण्यापूर्वीच विद्यार्थी हे परीक्षा कक्षात हजर होते,’’ असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परिणामी हा पेपर बदलण्यात येणार नाही, किंवा रद्द करून पुन्हा घेण्यात येणार नाही, असा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.