
डॉ. भूषण पटवर्धन यांची नॅकच्या राजीनाम्याची इच्छा
पुणे, ता. ३ ः नॅकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी विद्यापीठ अनुदान आयोगावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाच्या राजीनाम्या इच्छा व्यक्त केली आहे. त्याला यूजीसीनेही मान्यता दिली आहे. मात्र या प्रकारामुळे देशभरातील उच्च शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन, दिली जाणारी श्रेणी याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. पटवर्धन यांनी नॅक मूल्यांकनाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी डॉ. पटवर्धन यांनी ही इच्छा प्रकट केली. यूजीसीचे उपाध्यक्षपद भूषवलेल्या डॉ. भूषण पटवर्धन यांच्याकडे गेल्या वर्षी नॅकच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षणसंस्थांना नॅकच्या कक्षेत आणणे, नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नॅक मूल्यांकन प्रक्रियेबाबत त्यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. तसेच मूल्यांकनाचे निकष पहिल्यांदाच जाहीर करण्यात आले. मात्र गेल्या काही काळात कामकाज करताना आलेल्या अनुभवांनंतर त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा यूजीसीकडे व्यक्त केली आहे.