
विश्वकर्मा
नाव: प्रा. अंजूम अय्याज पटेल
पद: असिस्टंट प्रोफेसर- संगणक शास्त्र, विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स
महिला सबलीकरणाला हवी कृतीची जोड
आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना मानसन्मान देण्यात आलेला आहे. पण आता महिलांनी चुल आणि मुलांसोबतच ''देश आणि विदेश'' यांकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. “महिला सबलीकरण म्हणजे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कोणाच्याही साहाय्याशिवाय जीवन जगू शकते.” महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे. विश्वातील अर्धी मानवीशक्ती ही स्त्रीशक्ती आहे. ती शक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. “महिला सबलीकरण म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठता सिद्ध करणे असे नव्हे, तर महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागवणे होय.” असा विचारप्रवाह समाजात प्रस्थापित झाला तर खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण होईल. स्त्रियांचे योगदान हे कुटुंबापासून देशसेवेपर्यंत आहे. या दृष्टीने स्त्रियांची स्थिती व समस्यांवर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. बहुतांशी क्षेत्रात हे बदलाचे वारे वाहताना दिसते आहे. महिला सबलीकरण हा विषय फक्त चर्चेचा न राहता त्याला कृतीची जोड मिळणे महत्वाचे आहे.
नाव: मधू शितोळे
पद: विश्वकर्मा विद्यालय
आजची स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम
आजच्या स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, आई या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक अशा अनेक भूमिका खंबीरपणाने पार पाडत आहे. स्त्रीभ्रूणहत्येचा कलंकित गोष्टी अनेकदा ऐकावयास मिळतात त्याचवेळी समाजात मुलींना जन्म देऊन तिला प्रसन्नपणे सांभाळणारी कुटुंबेही पहावयास मिळतात. रूढीवादी परंपरा झुगारून देऊन लग्नाआधीच त्यांना शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे ही मानसिकता विकसित झाली आहे. मुलींच्या घरचे पाणीही वर्ज्य मानणाऱ्या समाजात लोक मुलींच्या घरी जाऊन आनंदाने राहू लागले आहेत. विवाहासाठी वर पसंत करताना तिच्या मतालाच महत्त्व दिले जाते. उच्च शिक्षणासाठी मुली लहान लहान खेड्यातून मोठ्या शहरात येऊन राहणे, नोकरी करणे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे यांसारख्या कृतीतून स्वतःचा आत्मविश्वास वाढवित आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने सखी, सहचारिणी बनली आहे. पत्नी बनून फक्त पतीने दिलेल्या सुख सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम झाली आहे असे मला वाटते आणि स्वतःही एक स्त्री असल्याचा नक्कीच अभिमान वाटतो.
नाव: सुनंदा सारडे
पद: एचएम- विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक
विस्तारलेले क्षितिज
स्त्री स्वतःच्या चिकाटीने असीम ध्येय साध्य करू शकते. महिला या शब्दाबरोबरच प्रेम, वासल्य, या जोडीलाच शक्ती संपन्न स्त्री लगेच समोर उभी राहते. आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र नवीन राहिलेले नाही. उलट काही क्षेत्रांमध्ये तर तिने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, सुरक्षा इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये ती समर्थपणे जबाबदाऱ्या पेलताना व नेत्र दीपक कामगिरी करताना दिसत आहे. गेली २५ वर्ष शिक्षिका म्हणून व आता मुख्याध्यापिका म्हणून विश्वकर्मा विद्यालयात कार्य करताना अनेक कडू गोड अनुभवातून जीवन समृद्ध होत गेले. आयुष्याच्या या वळणावर मागे वळून पाहताना स्त्री शिक्षिका असल्याचा अभिमान वाटतो कारण महिला व शिक्षिका या दोन्ही भूमिका पार पाडताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या आणि व्यक्तिमत्व विस्तारत गेले.
नाव: सुलभा देशमुख
पद: प्राचार्य, विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालय
महिला सशक्तिकरणात शिक्षण मोलाचे
शिक्षण आणि महिला यांच्या एकत्रीकरणाने राष्ट्र समृद्ध होते. मी एक महिला प्राचार्या म्हणून
विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी माध्यम या संस्थेत कार्यरत आहे. या क्षेत्रात योगदान देत असल्याचा
मला सार्थ अभिमान आहे. एक स्त्री म्हणून नेतृत्व करताना मुलांमध्ये प्रेम, करुणा आणि
वात्सल्य ही नैतिक मूल्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून
आणण्यासाठी योग्य दिशा दाखवून शाळेत कुटुंबासारखे वातावरण निर्माण व्हावे म्हणून सतत
प्रयत्नशील असते. त्याच वेळी एक स्त्री म्हणून सकारात्मक वृत्ती, आनंददायी वातावरण तयार
करण्यास मदत करते. त्यामुळे शाळेचा विकास होण्यास मदत होते. स्त्रियांमधील क्षमता कौटुंबिक
जीवन आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी मदत करते. आपल्या प्रगतीमध्ये
नकारात्मक गोष्टींचा अडथळा आल्यास स्त्री त्याच्या विरुद्ध लढा देऊन योग्य तो मार्ग काढू
शकते.
नाव: डॉ. शीतल प्रसून मंत्री
पद: विभाग प्रमुख (कॉमर्स), विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पुणे
आव्हानांना तोंड देण्यातच खरी मजा
नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतं खर तर लग्नानन्तर एक स्त्री म्हणून आपला प्रपंच आणि आपली स्वप्न दोघेही सांभाळणं साधी गोष्ट नसते. पण तिचा बाऊ करून घेण्यापेक्षा त्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यातच खरी मजा आहे. जगात अशा अनेक यशस्वी स्त्रिया आहेत ज्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, कल्पना चावला, सुधा मूर्ती, मेरी कोम, सायना नेहवाल. मला भावलेले व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ. “अनाथांची माय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्रीने विभूषित असणाऱ्या सिंधुताई यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते.
स्वतःचे जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित करणाऱ्या, स्त्री सशक्तिकरणाच्या प्रतीक असणाऱ्या अशा
या मातेला माझा प्रणाम. शेवटी मला एवढेच सांगावे वाटते की प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करावं.
नाव: प्रा. डॉ. वैशाली ए. पाटील
पद: डीन, अॅडमिनीस्ट्रेशन अँड रजिस्ट्रार, व्हीआयआयटी
महिला सक्षमीकरणातून आकांक्षापूर्ती
आपल्या आदिग्रंथांमध्ये स्त्रियांचे महत्व लक्षात घेऊन सांगण्यात आले आहे की “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:” अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांचा आदर केला जातो, तिथे देवतांचा वास असतो. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास करणे. महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे ज्या योगे त्यांना रोजगार, शिक्षण, आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील. तसेच त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांची प्रगती होईल. हाच मार्ग आहे ज्या द्वारे स्त्रिया पुरूषांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करू शकतात.
मी आजपर्यंत जे यश मिळवले ते मला खंबीरपणे पाठिंबा देणारे माझे वडील, पती, मुले, व इतर कुटुंबीय यांच्यामुळे. पण त्या मागे सिंहाचा वाटा हा माझ्या सासूबाई आणि आई यांचा आहे. त्या दोघीच माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. जर प्रत्येक स्त्री मागे कुटुंबीय खंबीरपणे उभे असतील तर महिलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.