‘दुर्गसंवर्धन’ मोहिमेतून गड-किल्ल्यांचे रक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दुर्गसंवर्धन’ मोहिमेतून गड-किल्ल्यांचे रक्षण
‘दुर्गसंवर्धन’ मोहिमेतून गड-किल्ल्यांचे रक्षण

‘दुर्गसंवर्धन’ मोहिमेतून गड-किल्ल्यांचे रक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे जिल्ह्याला गड-किल्ल्यांचा विशेष वारसा लाभलेला आहे. अशा या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या वतीने अनोखी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मावळ येथील ‘तुंग’ (कठिणगड) किल्‍ल्याच्या संवर्धनासाठी ‘दुर्गसंवर्धन’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये किल्ल्याचे संरक्षित स्मारक यादीमध्ये समावेश करण्यासाठी किल्ल्याच्‍या पायऱ्यांच्या बांधणीचे काम करण्यात येत आहे.
याबाबत प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष सचिन शेडगे यांनी सांगितले की, ‘‘तुंग किल्ल्यावर जुन्या पद्धतीने दगडी पायऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्या पुरातत्त्व विभागाकडून घेतल्या आहेत. सुमारे ७० दगडी पायऱ्या बांधून झाल्या आहेत.’’

फलकांवर क्‍यूआर कोड
दुर्गप्रेमींना तुंग किल्ल्याचा इतिहास, जैवविविधतेबाबत माहिती मिळण्यासाठी फलक लावले आहेत. त्यांच्यावर क्‍यूआर कोड दिले आहेत. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंशी संबंधित माहिती त्‍यांना सहज मिळते. ही माहिती संदर्भासहित ‘इतिहास मावळातील किल्‍ल्यावर’ पी.एच.डी केलेल्या डॉ. प्रमोद बोराडे यांनी दिली. हे सर्व व्हिडिओ मराठीत असून लवकरच ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करण्यासाठी काम सुरू आहे, असे शेडगे यांनी नमूद केले.

संशोधन करणाऱ्यांसाठी उपयुक्त
तुंग किल्ल्यावर स्थानिक तसेच इतर राज्यांतून पर्यटक येतात. त्‍यामुळे किल्ल्याचा इतिहास व त्याचे लष्करीदृष्‍ट्या असलेले महत्त्व आदींबाबत माहिती मिळावी म्हणून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये फलक लावले आहेत. विद्यार्थी संशोधकांना त्याचा फायदा होत असल्याचे प्रतिष्ठानचे मावळ तालुकाध्यक्ष राजेंद्र सातपुते यांनी सांगितले.

विरगळ जतन संवर्धनावर भर
- तुंग किल्ल्याच्‍या परिसरात युद्धाच्या आठवणी करून देणाऱ्या अनेक वीरांच्या स्मृतीशीळा व विरगळींचे जतन व संवर्धन
- प्रत्येक विरगळीची परिपूर्ण माहिती असलेला फलक
- विरगळींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत
- भविष्यात प्रत्येक किल्ल्यावर अशा प्रकारची वीरगळ स्मारक बनवली जावी, हा प्रकल्पाचा उद्देश

महत्त्वाच्या बाबी...
- तुंग किल्ल्याच्या परिसरात वन्यजीव आढळतात.
- विषारी, बिनविषारी व निमविषारी साप कोणते, याची माहिती लोकांना असणे गरजेचे.
- त्या अनुषंगाने वन्यजीव, सापांची माहिती देणारे फलक उपलब्ध.
- सर्पदंश झाला तर प्रथमोपचार काय करावेत, याची माहिती फलकावर नमूद.
- स्थानिक दुकानात प्रथमोपचार पेटी मोफत उपलब्ध.
- आपत्कालीन स्थितीसाठी पोलिस प्रशासन, बचाव कार्य, तसेच वन विभाग असे महत्त्वाचे संपर्क क्रमांक.