
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधी देण्याची गरज ः शेखर गायकवाड
पुणे, ता. ५ ः ‘‘कलाकारांच्या कलाकृतीला प्रोत्साहन, योग्य मोबदला मिळाल्यास त्यास चांगली निर्मिती करण्यास अधिक बळ मिळेल. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव संधी देण्याची गरज आहे. तर विद्यार्थ्यांनीही आपला भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे,’’ असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या ‘‘इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) ‘ऑरा २०२३’ या सजावट प्रदर्शनाचे संस्थेच्या सदाशिव पेठेतील महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव मोहम्मद शाहिद उस्मानी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष पवार, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, उद्योजक कल्याण तावरे, अध्यात्मिक समुपदेशक विद्यावाचस्पती विद्यानंद, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे हे १७ वे वर्ष असून या वेळी ‘शाश्वत विकासाची ध्येये’ या संकल्पानवर आधारित टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू या विषयावर भर देण्यात आला होता. गायकवाड म्हणाले, ‘‘कलेला वाव, पाठबळ दिले पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रमात अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना समाविष्ट करायला हवे. कल्पकतेला पैसे द्यावे, ही भावना रुजायला हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच पैसे कमावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही एखाद्या क्षेत्रात करिअर करताना आपला ‘बी प्लॅन’ ही तयार ठेवायला पाहिजे.’’