‘ती’च्या मोबाईल टॉयलेटची वाणवाच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’च्या मोबाईल टॉयलेटची वाणवाच !
‘ती’च्या मोबाईल टॉयलेटची वाणवाच !

‘ती’च्या मोबाईल टॉयलेटची वाणवाच !

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः एकीकडे पुणे महापालिका प्रशासन शहराचा तब्बल सात हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडते, तर दुसरीकडे महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. त्याशिवाय खास महिलांसाठीच्या ‘ती’ या मोबाईल टॉयलेटची वाणवा आहे. शहरात केवळ पाच ठिकाणीच ‘ती’ मोबाईल टॉयलेटस्‌ आहेत, काही ठिकाणचे मोबाईल टॉयलेटस्‌ विविध कारणांमुळे काढले आहेत. तर नवीन मोबाईल टॉयलेटला मुहूर्त मिळालेला नाही. बस, एसटी, रेल्वे स्थानक, महाविद्यालये, मैदाने अशा असंख्य सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी महिलांची लक्षणीय गर्दी असूनही मोबाईल टॉयलेटस्‌ पुरविणे महापालिका प्रशासनाला शक्‍य झालेले नाही.

सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छतागृहे कमालीचे अस्वच्छ असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होता. त्यामुळे अनेकदा महिलांना विविध प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागते. या सर्व प्रश्‍नांचा विचार करून पुणे महापालिका, स्मार्ट सिटी व साराप्लास्ट या संस्थेने महिलांसाठी ‘ती’ मोबाईल टॉयलेट प्रकल्प पुढे आणला. पीएमपीच्या जुन्या बसचे रूपांतर ‘मोबाईल टॉयलेट’मध्ये करून या बस गर्दीच्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली होती. सध्या जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान, शनिवारवाडा, शिवाजीनगर न्यायालय, औंध व वानवडी या ठिकाणीच ‘ती’ बस उपलब्ध आहेत.

‘ती’ बस हलविल्या !
शहरात मेट्रो, बीआरटी, उड्डाणपूल, पदपथ व अन्य कामे सुरु आहेत. त्याचा परिणाम ‘ती’ मोबाईल टॉयलेटवर झाला. संबंधित ठिकाणच्या कामांमध्ये या बसचा अडथळा ठरू लागल्याने तेथून बस हलविल्या आहेत. संबंधित ठिकाणची कामे संपली आहेत का?, याची चाचपणी महापालिका प्रशासन करत आहे.

शहरात सध्या पाच ठिकाणी ‘ती’ मोबाईल टॉयलेट सुरु आहेत, त्यासमवेत एकूण ११ ठिकाणी या बस ठेवणार आहे. विविध प्रकारच्या कामांमुळे काही ठिकाणांवर ‘ती’ बस उभ्या करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यायी ठिकाणांचा शोध सुरु आहे. याबरोबरच कार्यक्रमांच्या ठिकाणी महिलांसाठी सिंगल, पोर्टेबल मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिली जात आहेत.
- आशा राऊत,
घनकचरा विभाग प्रमुख, महापालिका

‘ती’ मोबाईल टॉयलेटमुळे अनेकदा महिलांची समस्या सुटते. मात्र, या बस मोजक्‍याच व कमी ठिकाणी आहेत. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा बस उपलब्ध करून दिल्यास महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.
- पल्लवी सोनटक्के, नोकरदार

‘ती’ मोबाईल टॉयलेट व बहुपयोगी ठिकाण
- भारतीय व पाश्चात्त्य टॉयलेट
- पाणी बचत तंत्रज्ञानाचा वापर
- पिण्याचे पाणी, पॅनिक बटन, वायफायची व्यवस्था
- डिजिटल फीडबॅक सिस्टीम
- सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याचे मशिन
- प्रशिक्षित महिला कर्मचारी व सुरक्षिततेला प्राधान्य