महिला सहभागामुळे जीडीपी ५ टक्क्यांनी वाढेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सहभागामुळे जीडीपी ५ टक्क्यांनी वाढेल
महिला सहभागामुळे जीडीपी ५ टक्क्यांनी वाढेल

महिला सहभागामुळे जीडीपी ५ टक्क्यांनी वाढेल

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः देशाच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, पुर्ण क्षमतेने त्यांचा सहभाग वाढला तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न पाच टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अलकेश कुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या (सी-मेट) ३३ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एसीई विभागाचे महासंचालक डॉ. एस. व्ही. गाडे, नॅशनल सायन्स चेअरचे प्रा. गणपती यादव, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सी-मेटचे संस्थापक संचालक डॉ. एस. जी. पाटील, सी-मेटचे महासंचालक डॉ. बी. बी. काळे आदी उपस्थित होते.

शर्मा या वेळी म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञानाइतकेच, पदार्थ विज्ञानातील संशोधन हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारा घटक आहे. आपण केवळ भारतासाठी नाही तर विश्वकल्याणासाठी तंत्रज्ञानाचा आग्रह धरतो. त्यामुळे हे दशक भारताचे आहे. वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप परिसंस्थेमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात आपण जागतिक महासत्ता बनत आहोत.’’ तर ज्येष्ठ शास्रज्ञ प्रा. यादव म्हणाले, ‘‘भारतीय कौटुंबिक व्यवस्थेचा पाया हा स्री शक्तीवर अवलंबून असून, देशात महिलांना पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण मोफत द्यायला हवे. ज्यामुळे अनेक सामाजिक कुप्रथा आणि मागासलेपण नष्ट होईल. नव्या तंत्रज्ञानासाठी उद्योगांनी शैक्षणिक संस्थांबरोबर परस्पर सहकार्य वाढविण्याची गरज आहे.’’ सी-मेटच्या उभारणीच्या काळातील आव्हानांची माहिती संस्थापक डॉ. पाटील यांनी या वेळी दिली. तर डॉ. काळे यांनी सी-मेटच्या विविध सेंटर ऑफ एक्सलन्स आणि संशोधन कार्याची माहिती दिली.

पहिली बैठक पुण्यात
पुणे शहरात २७ पेक्षा जास्त संशोधन संस्था कार्यरत असून, त्यांच्यामध्येच परस्पर संवादाचा अभाव असल्याची खंत प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘वैयक्तिक यशापेक्षा सामुहिक उपलब्धी चिरंतन असते. देशात संशोधन संस्थाची क्षमता अफाट आहे. मात्र, संशोधन संस्था आणि उद्योगांमध्ये परस्पर संवादाचा अभाव दिसत असून, निदान पुण्यात तरी परस्पर संवादाचा सेतू बांधला जायला हवा.’’ मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआय) माध्यमातून अशी बैठक घेण्याचा प्रस्तावही पवार यांनी मांडला. त्याला संमती दर्शवत मंत्रालयाचे सचिव अलकेश कुमार शर्मा यांनी पहिली बैठक पुण्यात घ्यायचे घोषित केले. ते म्हणाले, ‘‘उद्योग आणि संशोधन संस्थांच्या परस्पर सहकार्याची प्रचंड गरज आहे. त्यासाठी संशोधन संस्थांमध्ये बिजनेस सेलही निर्माण करण्याची जबाबदारी दिली आहे. देशातील पहिली संशोधन संस्था आणि उद्योगांमधील बैठक पुण्यात पार पडावी. ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रतापराव पवार यांनी स्विकारावी.’’