
पाणी क्षेत्रातील महिलांच्या सहभागावर कार्यशाळा
पुणे, ता. ८ : पाणी क्षेत्रात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. घरात पाणी आल्यानंतर त्याचा जपून वापर केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी जलसाक्षर होणे गरजेचे आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सेवानिवृत्त सहसचिव जयलक्ष्मी चेकल्ला यांनी बुधवारी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत ‘‘पाणी क्षेत्रात महिलांचा सहभाग’’ या विषयावर कार्यशाळा झाली. या वेळी आघारकर इस्टिट्यूटचे सेवानिवृत्त जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. कांतीमती कुळकर्णी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, माधवी दुबे, डॉ. सोनाली शिंदे, अंकीता यादव, सुजाता सावळे, प्रिती देशमुख, भाग्यश्री साहू यांच्यासह महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. या वेळी पाणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवापूर (नंदुरबार) तालुक्यातील बोकळझर येथील सुमन गावीत, बोरमणी (सांगोला) येथील अनिता माळगे यांना गौरव पुरस्कार, तर सुनिता केसकर, रूपाली कठरे यांना प्रशंसापत्र, दीपिका सोनी (बहादरपूर, मध्यप्रदेश), नंदा भुजबळ (शिक्रापूर), दीपाली पाटील (अटल भूजल विभाग) आदी महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी चेकल्ला, डॉ. कुळकर्णी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसंचालक भाग्यश्री मग्गीरवार यांनी प्रास्तविक केले. भूवैज्ञानिक सुवर्णा शितोळे यांनी आभार मानले.