मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य
मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य

मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी ‘अघोरी पूजे’च्या नावाखाली मानवाच्या हाडांची भुकटी (पावडर) सेवन करण्यास भाग पाडल्याची घटना शहरात जानेवारीमध्ये घडली होती. या घटनेचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले असतानाच पुन्हा एका महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मासिक पाळी सुरू असताना एका महिलेशी अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या संदर्भात एका २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कथले (सर्व रा. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींविरूद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाइकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मासिक पाळीदरम्यान आरोपींनी संगनमत करून महिलेशी अघोरी कृत्य केले. या छळास कंटाळून ती माहेरी आली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.

‘अघोरी पूजे’चे विधिमंडळात पडसाद
शहरात जानेवारी महिन्यात एका महिलेसोबत झालेल्या ‘अघोरी पूजे’च्या प्रकरणाची विधिमंडळात दखल घेण्यात आली. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.