
मृतांच्या नातेवाइकांपैकी ३१३ कुटुंबांना दुबार मदत
पुणे, ता. ८ : जिल्हा प्रशासनाच्या अजब कारभारामुळे पुण्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांपैकी ३१३ कुटुंबांना दुबार लाभ दिला गेला असल्याचे समोर आले आहे. आता अशा दुबार मदत मिळालेल्यांकडून रक्कम वसूल करण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ८० जणांकडून ५० हजार याप्रमाणे ४० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला होते. या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात खास कक्षदेखील सुरू करण्यात आला. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातून ३२ हजार ५९० अर्ज दाखल झाले. त्यापैकी २५ हजार ४५५ जणांच्या थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. मात्र, त्यापैकी ३१३ जणांना दुबार म्हणजेच ५० हजारऐवजी एक लाख रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता न करणे, कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही किंवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सिद्ध करता आलेले नाही, तसेच कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींनी अर्ज केले आहेत, असे ३ हजार ८३३ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ‘तांत्रिक बाबींमुळे २५ हजार ४५५ जणांपैकी ३१३ जणांच्या खात्यावर जास्त पैसे वर्ग झाले आहेत. आता संबंधितांकडून ती वसूल करण्यात येत आहे. त्यामध्ये ८० जणांकडून ती रक्कम वसूल करण्यात यश मिळाले आहे. उर्वरितांकडून पैसे वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.