जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पला हवा ‘बूस्टर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैववैद्यकीय कचरा 
विघटन प्रकल्पला हवा 
‘बूस्टर’
जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पला हवा ‘बूस्टर’

जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पला हवा ‘बूस्टर’

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः शहरात दैनंदिन उपचार, तपासणी केंद्र, रुग्णालय, मेडीकल स्टोअर आदींसाठी महत्त्वाचा असलेल्या जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. गेल्या वर्षी जुलैनंतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार होते. मात्र आता मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प संपूर्णपणे कार्यरत होण्याची शक्‍यता आहे.
कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातील प्रकल्‍प सुविधांचा अभाव जाणवला. दरम्यान शहरात दरवर्षी निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शहरातच कार्यक्षम प्रकल्पाची गरज लक्षात घेत पुणे महानगरपालिका आणि पास्को इन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स कंपनीच्या वतीने या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली आहे. हे जैववैद्यकीय विघटन प्रकल्प पुणे रेल्‍वे स्टेशन येथील कैलास स्मशानभूमीच्या आवारात आहे.

असे होत गेले प्रकल्पाचे काम
- एप्रिल २०२१ पर्यंत प्रकल्पाचे काम ५० टक्के झाले होते
- तर मार्च २०२२ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन त्यात ऑटोक्लेव्‍ह आणि इनसिनिरेशन मशिन बसविण्यात आल्‍या
- त्‍यानंतर पासून प्रकल्पातील मशिनच्या प्रायोगिक तत्त्वावरील चाचण्या सुरू झाल्या
- प्रकल्पाची चाचणी पूर्ण होताच जुलै २०२२ नंतर हे प्रकल्प संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार होते

काय आहे स्थिती?
- जैववैद्यकीय कचरा संकलन बिंदूंची संख्या ः ७९६
- दररोज गोळा होणारा कचरा एकूण ः सुमारे ७,८०० किलोग्रॅम

यामुळे होत आहे विलंब
- सध्या इनसिनिरेशन मशिनच्या चाचण्या सुरू आहेत
- विजेची जोडणीशी संबंधित काम अद्याप सुरू आहे
- प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली विघटन प्रक्रियेतील तृटी शोधून त्यावर काम केले जात आहे
- पिवळ्या कलरकोडच्या जैववैद्यकीय कचऱ्‍याला वगळता इतर कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे
- कचरा विघटन प्रकल्‍पातील मशिनच्या कार्यक्षमतेची चाचणी व त्यावर आधारित दुरुस्ती तसेच वीज पुरवठ्यासाठी वेळ लागत आहे

कलकोडनुसार जैववैद्यकीय कचरा
लाल ः सलाइनच्‍या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्‍या, लसीकरणासाठी वापरले जाणारे सिरींज
निळा ः काचेच्‍या बाटल्‍या, शार्प्स, औषधी कुपी आदी. या कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करत त्यास पुनर्चक्रीकरणासाठी पाठवले जाते.
पांढरा ः धारदार वस्तू जसे की ब्‍लेड, सुया, शार्प्स आदी
पिवळा ः शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेले कापसाचे बोळे, संसर्गजन्य वैद्यकीय कचरा, मुदत संपलेले औषध, निकामी झालेला अवयव किंवा नाळ सारखे इतर गोष्टी, तसेच वैद्यकीय रासायनिक कचरा, क्लिनिकल लॅब कचरा आदी.

कलरकोडनुसार संकलित होणारा कचरा (किलोग्रॅममध्ये)
पिवळा ः ४०७२.४८६
लाल ः ३००६.१८२
पांढरा ः १४४.३६७
निळा ः ६५४.०५६

प्रकल्पातील ऑटोक्लेव्ह आणि इनसिनिरेशन मशिनच्या चाचण्या सुरू असताना त्यामध्‍ये आढळणाऱ्या समस्या व त्रुटींना दुरुस्‍त करण्यासाठी वेळ गेला. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) निवेदन दिल्यावर त्यांच्याद्वारे होणाऱ्या प्रकल्‍पाची पाहणीसाठी काही काळ थांबावे लागले. दरम्यान आता वीज पुरवठ्यासाठी आम्ही वाट पाहत आहे. ती या आठवड्यापर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या इनसिनिरेटर मशिन सुरू होणे बाकी आहे. त्यामुळे इनसिनिरेशन होणारी प्रक्रिया सोडून इतर सर्व प्रकारच्या प्रक्रिया प्रकल्पात होत आहे.
- सुनील दंडवते, संचाल, ‘पास्को’