राँग नंबरची मजा मंजूर केली रजा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राँग नंबरची मजा
मंजूर केली रजा!
राँग नंबरची मजा मंजूर केली रजा!

राँग नंबरची मजा मंजूर केली रजा!

sakal_logo
By

‘‘अहो राँग नंबरवर कोणी गप्पा मारत बसतं का? समोरच्याचं पहिलं वाक्य ऐकल्यानंतर लगेचच ‘हा राँगनंबर आहे’, हे आपल्या लक्षात येतं. त्याचवेळी ‘राँग नंबर’ म्हणून फोन ठेवून द्यायला काय होतं.?’’ प्रियांकाने महेशला धारेवर धरले.
‘‘अगं तुझ्यामुळेच मला ही सवय लागली. तुला कोणा बाईचा राँगनंबर आला तरीही तू तिच्याबरोबर तासभर गप्पा मारत बसायची. हवा-पाण्याबरोबरच तिच्या माहेरची, सासरची सगळी चौकशी करून झाल्यावर, ‘राँग नंबर’ म्हणायचीस आणि ‘काळजी घेत जा बाई, कोणत्या अनोळखी फोनवर बोलत बसू नकोस. नाहीतर पस्तावशील’ असा सल्लाही द्यायचीस.’’ महेशने तिला जुनी आठवण करून दिली.
‘‘आऊटगोईंग आणि इनकमिंग स्वस्त झाल्यावर त्याचा फायदा नको घ्यायला? आम्हाला बाई स्वस्ताईचे फार आकर्षण असते. त्यामुळे एखादी गोष्ट निम्म्या किमतीत मिळायला लागल्यावर, आम्ही गरज नसली तरी विकत घेतोच. पण तुमच्याबाबत असं कधी होत नाही.’’ प्रियांकाने म्हटले.
‘‘मला लोकांच्या सुख दुःखाशी समरस व्हायला फार आवडते. त्यामुळे मी लगेचच राँगनंबर म्हणत नाही. समोरच्याचं ऐकून घेणं, हल्ली दुर्मिळ होत चाललंय. ते पुण्याचं काम करतो.’’ महेशने आपली बाजू सावरली.
‘‘डोंबलाचं पुण्याचे काम. तुम्ही उलट गोंधळ घालून, समोरच्याच्या अडचणी वाढवून ठेवता.’’ प्रियांकाने म्हटले. थोड्यावेळाने महेशला एका महिलेचा फोन आला.
‘‘सॉरी...मी आज सकाळी तुम्हाला फार टाकून बोलले.’’ फोनवरील महिला रडत म्हणाली.
त्यावर महेशने फक्त ‘हूं’ केले.
‘‘तुम्ही माझ्यावर अजूनही नाराज आहात वाटतं. त्यामुळेच तुम्ही काही बोलत नाही. प्लीज, मला माफ करा.’’ त्या महिलेने पुन्हा म्हटले.
एक महिला नवऱ्याची माफी मागत आहे, हे ऐकूनच महेश धन्य झाला. आपल्या आयुष्यात हा प्रसंग घडण्याची शक्यता नसल्याने तो फक्त ‘हूं’ ‘हूं’ करत राहिला.
‘‘खरं तर मीच भांडण वाढवायला नको होते. पण बोलण्याच्या नादात मी तुमचा अपमान केला. माझ्या मेलीचंच चुकलं.’’ असं म्हणून ती पुन्हा रडू लागली.
‘‘चल जाऊ दे. तुला माफ केलं.’’ नकळतपणे महेश बोलून गेल्यावर पलीकडच्या महिलेने रणचंडिकेचा अवतार धारण केला.
‘‘अय माकडा, तू कोण रं मला माफ करणारा? माझ्या नवऱ्याचा असा आवाज नाही. तुला लाज वाटते का? क्रॉस कनेक्शन झालं असेल किंवा राँगनंबर लागला असेल. वेळीच ‘राँगनंबर’ म्हणता येत नाही का? एका अनोळख्या महिलेच्या बोलण्यात इंटरेस्ट दाखवतोस. कुठं फेडशील पाप.’’ असं म्हणून तिने रागाने फोन कट केला. झालेल्या अपमानाने महेश एकदम शांत झाला. आपल्या बायकोने काही ऐकलं नाही ना, याचाही त्याने अंदाज घेतला. पण ती किचनमध्ये मग्न होती. त्यामुळे त्याने निःश्‍वास सोडला. थोड्यावेळाने पुन्हा फोन आला.
‘‘सर, मला अर्जंट दोन दिवसांची रजा पाहिजे.’’ पलीकडील व्यक्तीने विनवणी करत म्हटले. त्यावर महेशने फक्त ‘हूं’ केले.
‘‘सर, बायकोला माहेरी कोल्हापूरला सोडायचं आहे. त्यामुळे तातडीने रजा हवीय.’’ पलीकडच्या व्यक्तीने म्हटले. तेवढ्यात महेशने टीव्हीचा आवाज वाढवला.
‘‘अरे दोनच काय पंधरा दिवसांची रजा घे. बायकोला माहेरी सोडल्यानंतर ऐश कर.’’ महेशने म्हटले.
‘‘सर, टीव्हीमुळे ऐकू येत नाही. मोठ्याने बोला.’’ पलीकडून आवाज आला.
‘‘पंधरा दिवसऽऽऽ..पंधरा दिवस रजा घेऽऽऽऽ....’’ महेशने मोठ्याने म्हटले. पलीकडून फक्त ‘थॅंक यू सर...थॅंक यू सर...’ एवढेच शब्द ऐकू येत होते.
‘‘अहो, कोणाला पंधरा दिवसांची रजा मंजूर केलीत.?’’ प्रियांकाने रागाने म्हटले.
‘‘मला काय माहिती? राँग नंबर होता. मला बॉस समजून बोलत होता. एखाद्याच्या मदतीला धावणं, हे आपले कर्तव्य आहे. ते मी पार पाडलं.’’ असे म्हणून महेश गालातल्या गालात हसू लागला.