महिलांच्या सायबर तक्रारी : केंद्राने उपाययोजना करण्याचे मत स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या सायबर तक्रारी : केंद्राने उपाययोजना करण्याचे मत
स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी
महिलांच्या सायबर तक्रारी : केंद्राने उपाययोजना करण्याचे मत स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी

महिलांच्या सायबर तक्रारी : केंद्राने उपाययोजना करण्याचे मत स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : सोशल मीडिया, इंटरनेट हा आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु इंटरनेटमुळे अनेक महिलांना ट्रोलिंग, गैरवर्तन व फसवणूक आदींचा सामना करावा लागतो. त्यामुळे इंटरनेटच्या सुरक्षित वापरासाठी केंद्र सरकारने अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे देशातील सुमारे ८५ टक्के महिलांचे मत आहे.

इंटरनेटही काळाची गरज झाली आहे. ऑनलाइन व्यवहार, कार्यालयीन कामे, ऑनलाइन क्लासेस, व्यवसाय अशा एक अन् अनेक गोष्टी इंटरनेटमुळे होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा हळूहळू उपलब्ध होत असताना याच्या वापरातही वाढ झाली आहे. दरम्यान, इंटरनेटचा वापर करताना महिलांना होणारे फायदे, त्यांची गरज आणि यामुळे उद्‍भवणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी ‘लोकल सर्कल्स’च्या वतीने नुकतेच देशातील शहरी भागांतील महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणानुसार १० पैकी ८ महिला विविध गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यामध्ये काही महिला या आपल्या कुटुंब व मित्र परिवाराशी संपर्कात राहण्यासाठी तर काही माहिती व मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे मत नोंदवीत आहेत. असे असले तरी अनेक महिलांना ऑनलाइन फसवणूक, छळ, गैरवर्तन, ट्रोलिंग आदींचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी सायबर तक्रारींवर जलद कारवाई करणे, तसेच केंद्र सरकारने ‘महिला सायबर तक्रार’ या राष्ट्रीय हेल्पलाइन सेवेची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. ज्या माध्यमातून महिलांनी तक्रार केल्‍यास २४ तासांच्या आत त्याबाबत आवश्‍यक ती कारवाई होईल. हे सर्वेक्षण सुमारे ३०० जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. यामध्ये एकूण २३००० हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता.

सर्वेक्षणातील महत्त्वाच्‍या बाबी :
- ऑनलाइन लैंगिक छळ, गैरवर्तन, ट्रोलिंग आदींबाबत तक्रार करताना बहुतांश पोलिस ठाण्यांत एकही महिला अधिकारी उपस्थित नसल्याने तक्रार करणे त्रासदायक
- अगदी शहरी भागातही महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे, बहुतेक स्त्रिया तक्रार दाखल करण्याचा विचारही करत नाहीत
- माहिती, मनोरंजन, रोजगार किंवा व्यवसाय चालवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना तो तापदायक ठरू नये असे सर्वाधिक महिलांचे मत
- सायबर गुन्ह्यांशी निगडित तक्रारींकडे सरकार, सायबर गुन्हे शाखा यांनी लक्ष देणे
- स्वतंत्र ‘महिला सायबर तक्रार’ राष्ट्रीय हेल्पलाइन सेवेची मागणी, जी केवळ महिलांच्या तक्रारींची नोंद करण्याबरोबर स्थानिक पोलिसांशी समन्वय साधेल
- अशा प्रकरणांत तक्रारदारांचा पोलिसांकडून छळ होणार नाही याची खात्री करून वेळेवर कारवाई व्हावी
- पुरावे सादर केल्याच्या २४ तासांच्या आत सर्व प्लॅटफॉर्मद्वारे अनिवार्य कारवाई सुनिश्चित करणे

विविध गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिला
- स्वतःचा व्यवसाय चालविण्यासाठी : ५
- रोजगारासाठी : १४
- ऑनलाइन खरेदीसाठी : ४६
- विविध सेवांचे पेमेंट किंवा तिकिटांचे बुकिंग : ३५
- इंटरनेटद्वारे माहिती मिळविण्यासाठी : ५७
- सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध समस्या मांडण्यासाठी : १९
- मनोरंजनासाठी : ५७
- कुटुंब किंवा मित्र परिवाराशी संपर्क साधण्यासाठी : ७६
- इतर कारणांसाठी : १४