भारतीय नेमबाजीतील विक्रमी इतिहास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय नेमबाजीतील विक्रमी इतिहास!
भारतीय नेमबाजीतील विक्रमी इतिहास!

भारतीय नेमबाजीतील विक्रमी इतिहास!

sakal_logo
By

व्यावसायिक खेळांमधील नेमबाजीत अंजली भागवत-वेदपाठक यांनी वीस वर्षांपूर्वी देदीप्यमान इतिहास रचला.
अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘आयएसएसएफ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन्स पुरस्कार’ त्यांना म्युन्शेन येथे मिळवून त्या जगातील, तेव्हाच्या पहिल्या क्रमांकावरील नेमबाज ठरल्या. भारतीय महिलांसाठी नेमबाजीसाठी राजमार्ग तयार करणाऱ्या अंजली यांचे मनोगत....

परिपूर्णतेकडे जाण्याचा ध्यास
अंजली म्हणाल्या, ‘‘बारा वर्षे मी पुण्यात वास्तव्याला असून दररोज माझा नेमबाजीचा कसून सराव करतेच, शिवाय अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात धन्यता मानते आहे. सहा ते साठ वर्षांचे स्त्री-पुरुष माझ्याकडे शिकले आहेत. चौसष्ट वर्षे वयाच्या एका ज्येष्ठ महिलेचा त्यांत समावेश आहे. मला नेमबाजीने काय नाही दिले? जगभर प्रसिद्धी, पैसे, अनेक विक्रमांची संधी व त्यात भरभरून यश मिळाले. पण यापुढे जाऊन मला परिपूर्णतेकडे जाण्याचा ध्यास नेमबाजीनेच दिला.’’

...हे मला माहीत नव्हते
सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, कॉमनवेल्थ खेळांमध्ये बारा सुवर्ण व चार रौप्यपदके, दहा मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्स रायफल तीन पी प्रकारात कॉमनवेल्थमध्ये विक्रम, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकंदर पंचावन्न सुवर्ण, पस्तीस रौप्य व सोळा ब्रांझ पदकांची कमाई नेमबाजीनेच तर माझ्या पदरात टाकली. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही आठ विक्रम नोंदवू शकले. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, श्री शिव छत्रपती पुरस्कार यांसारख्या अनेक गौरवांची मानकरी ठरले. पण गंमत अशी की, मी महाविद्यालयात जाईपर्यंत नेमबाजी नावाचा; इतका महत्त्वाचा खेळ असतो, त्याला जागतिक पटलावर मोलाचे स्थान आहे; हे मला अजिबात माहीत नव्हते.

अंजली म्हणते...
- एनसीसीत होते. त्यामुळे मला नेमबाजीबाबत कळले
- तेथे प्रशिक्षणाचा भाग म्हणून नेमबाजीचा प्रयत्न पहिल्यांदा केला
- तेव्हा तर एकही गोळी लक्ष्यापर्यंत पोहोचली नाही
- पण सरावाने मला यात रस वाटू लागला
- यश सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी झपाटून प्रयत्न करावे लागतात

...तेव्हा रोमांच येतात
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेती ठरल्यावर जेव्हा जेव्हा आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि राष्ट्रगीत आपल्यासाठी वाजते, तेव्हा रोमांच येतात. आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या देशबांधवांची मान आपल्यामुळे उंचावली गेल्याचे समाधान असते. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना हेच सांगू इच्छिते की, आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असू द्या. क्षमता उंचावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. त्यातील आनंदाचा शोध घ्या.

एकाग्रता व आत्मविश्वास वाढीस लागण्याची सवय मनाला लावून घेणे हिताचे ठरते. शारीरिक स्वास्थ्य उत्तम तर मनही आनंदी राहते. यासाठी नियमितपणे योग्य व्यायाम व आहाराची मदत होते. एकंदरीत जगणे साधे, परंतु शाश्वत मूल्ये व सकारात्मकतेने समृद्ध असले तर वाट सापडत जाते.
- अंजली भागवत-वेदपाठक