
वंचित विकासतर्फे आयोजित नाटकाला चिमुकल्यांचा प्रतिसाद
पुणे, ता. १२ ः गमतीजमती करत हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांसह शाळकरी मुलांनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा मनमुराद आनंद लुटला. या नाटकातील गाण्यांवर ठेका धरत आणि चेटकिणीच्या धूर्त कल्पना, दिलखेचक अभिनय आणि ‘कित्ती गं बाई मी हुश्शार’ची नक्कल अनुभवत चिमुकल्यांनी धमाल केली.
निमित्त होते, मॉरिश फॅमिली फंड, यूएसए व वंचित विकास यांच्यातर्फे खास चिमुकल्यांसाठी आयोजित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाच्या विनामूल्य प्रयोगाचे. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित या उपक्रमाचा सुमारे एक हजार ७०० जणांनी लाभ घेतला.
‘वंचित विकास’च्या संचालक सुनीता जोगळेकर, खजिनदार उद्धव भडसाळकर, कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्यासह नाटकाचे संयोजन केलेल्या तेजस्विनी थिटे, अजयकुमार निकुंभ, शमशुद्दीन शेख आणि मिलिंद जोगळेकर यांनी नाटकांच्या दोन्ही प्रयोगांचे यशस्वी आयोजन केले. रोजची शाळेची धावपळ, अभ्यासाचा ताण, परीक्षांची चिंता यातून बाहेर काढण्यासाठी व वास्तवातील निखळ आनंद मिळवून देण्यासाठी अभिरुची वर्ग, लालबत्ती विभागातील मुले, आश्रमशाळा, पालक, संस्थेचे देणगीदार व हितचिंतक यांच्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.