
‘लोक में शक्ती आराधन’चे कर्नाटकात सादरीकरण
पुणे, ता. १३ ः कर्नाटकातील गदग येथे पार पडलेल्या स्वराज आंतरराष्ट्रीय महोत्सवात संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे ‘लोक में शक्ती आराधन’ या नृत्य नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.
विविध देशांच्या तसेच देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या प्रतिनिधींसमोर हे सादरीकरण झाले. भारतात केल्या जाणाऱ्या विविध रूपातील शक्तींच्या आराधनेची अभिव्यक्ती या नाटिकेतून करण्यात आली. या नृत्य नाटिकेची प्रस्तुती व संयोजन प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी यांचे आणि संहिता व संगीत संयोजन मैत्रेयी बापट यांचे होते. या ध्वनीफितीला अभिनेते नितीश भारद्वाज यांनी आवाज दिला, तर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र भारती यांनी मार्गदर्शन केले. सुजा दिनकर, सायली काणे, मयूरी राऊत, सुरभी बोडे, मैत्रेयी बापट, रश्मी म्हसवडे, कल्याणी साळेकर, ईशा वेल्हणकर, तनया कानिटकर, हेमांगी ठाकूर आणि रिया क्षीरसागर या नृत्यांगनांनी यात सहभाग घेतला होता.