
मायलॅब, ‘डीएनएनज’ यांच्यात भागीदारी
पुणे, ता. १३ : मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन्स निदानशास्त्रामधील ब्रिटनमधील ‘डीएनएनज’ सोबत, अत्याधुनिक मोलेक्युलर निदानात्मक सोल्यूशन्स विकसित करण्याच्या उद्देशाने भागीदारी करत असल्याचे सोमवारी जाहीर केले. डायबेटिक फूट अल्सरसह अन्य काही महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक निदानासाठी ही साधने विकसित केली जाणार आहेत.
थायलंडचे माजी पंतप्रधान डॉ. थाकसिन शिनावात्रा तसेच यिंगल्युक शिनावात्रा, ‘डीएनएनज’चे सहसंस्थापक तसेच लंडन येथील इम्पिरियल कॉलेजमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे संस्थापक रीजस प्रोफेसर ख्रिस तौमाझोऊ आणि मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
नोव्हेल डायबेटिक फूट अल्सर डिटेक्शन किट हे या दोन कंपन्यांद्वारे सहविकसित केले जाणाऱ्या पहिल्या काही चाचणी किट्सपैकी एक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. ‘डायबेटिक फूट अल्सर्स’ (डीएफयू) ही मधुमेहींमधील समस्या आहे. या रुग्णांना होणाऱ्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागते. काही वेळा पाय, घोटा, पाऊल काढून टाकण्याचीही वेळ येते. फूट अल्सर्समधील बहुतेक जिवाणू हे सामान्यपणे दिल्या जाणाऱ्या प्रतिजैवकांना प्रतिरोध करतात, असेही अनेक अभ्यासामध्ये आढळले आहे. पारंपरिक कल्चर पद्धतींमध्ये, जखमेतील जीवाणूंचे निदान होणे आव्हानात्मक ठरते. कारण, जीवाणूंमधील वैविध्यांबाबत या चाचणीतून पूर्ण माहिती मिळत नाही.
ख्रिस तौमाझोऊ म्हणाले, ‘‘वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कायापालट घडवून आणणारे शोध लावण्यासाठी भारत व ब्रिटन एकत्रितपणे काम करत आहेत, हे यातून प्रकर्षाने दिसते.’’
केवळ एका तासात निष्कर्ष
देशातील मधुमेही रुग्णांचे प्राण वाचवण्याचे तसेच अवयव काढून टाकणे टाळण्याचे उद्दिष्टाने मायलॅब व ‘डीएनएनज’ यांच्यातील भागीदारी उपयुक्त ठरेल. अल्सरमधील सुक्ष्म जिवांचे निदान करून त्यावर तातडीने उपचार करण्यात यातून डॉक्टरांना मदत होईल. या चाचणीमुळे प्रादुर्भावातील जिवाणू शोधणे शक्य होते आणि मोलेक्युलर प्रतिजैविक प्रतिरोधाबद्दलही (एएमआर) केवळ एका तासात निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे या जीवाणूंविरोधात कोणती प्रतिजैविके अधिक प्रभावी ठरतील हे निश्चित करण्यात डॉक्टरांना मदत होते.
ही भागीदारी म्हणजे, जगभरात अत्याधुनिक मोलेक्युलर निदान साधने उपलब्ध करण्याच्या आमच्या प्रवासातील, आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘डीएनएजनच्या पॉइंट-ऑफ-केअर’ जनुकीय चाचणी तंत्रज्ञानातील कौशल्याच्या माध्यमातून आम्ही एकत्रितपणे अचूक व उच्च दर्जाची निदानात्मक साधने विकसित करू शकू आणि जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात ती साधने आणू शकू.
- हसमुख रावळ, व्यवस्थापकीय संचालक, मायलॅब
......