खडकवासला, उजनीतील प्रदूषण रोखा

खडकवासला, उजनीतील प्रदूषण रोखा

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली.
केंद्रीय वने, पर्यावरण व कामगार मंत्री भूपिंदर यादव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी खडकवासला धरणाबरोबरच राम नदी आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाबतही चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जलस्रोतांच्या प्रदूषणाची माहिती देऊन यावर उपाययोजना करण्याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पुणे शहर आणि पुढील काही तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यात रासायनिक घटकांचाही समावेश असून पिण्यासाठी खास राखून असलेल्या या जलस्रोतांतील प्रदूषित पाणी पिऊन रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही. याशिवाय उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र देखील प्रदूषित झाले आहे. उजनी धरणात मिसळत असलेल्या प्रदूषित पाण्यामुळे येथील खास ओळख असणाऱ्या स्थलांतरित पक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाढत्या नागरिकीकरणामुळे राम नदीचे पाझर अडले असून त्याचा परिणाम नदीच्या जलसंकलनावर होत आहे. त्यामुळे तातडीने उपयोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

केंद्रीय मंत्र्यांचे आभार
चालू वर्षाच्या सुरुवातीलाच बारामती येथे शंभर खाटांचे इएसआयसी रुग्णालय उभे करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. याशिवाय पालखी महामार्गावरील दिवे घाटाच्या रुंदीकरणास वन खात्याच्या परवानगी अभावी अडथळे येत होते. तो अडथळाही भुपेंद्र यादव यांच्याकडून दूर झाला असून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याने रुंदीकरणाचा मार्ग सोपा झाला आहे. या दोन्ही कामांसाठी सहकार्य केल्याबद्दल खासदार सुळे यांनी यादव यांचे यावेळी आभार ही मानले.
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com