
शिवाजीनगर एसटी स्थानक मूळ जागेतच
पुणे, ता. १४ ः शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या मूळ जागेवरच एसटी स्थानक होणार असून ते काम दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ‘इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट प्लॅन’नुसार स्थानकाचे काम होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या कामकाजात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या बाबतचा प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. शिवाजीनगर स्थानकाचे काम केव्हा पूर्ण होणार, स्थानक कोठे होणार, किती कालावधीत ते पूर्ण होणार आणि मूळ आराखड्यानुसार (इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट प्लॅन) ते होणार का, अशी विचारणा शिरोळे यांनी केली. त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले, ‘‘शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या मूळ चार एकर जागेपैकी एक एकर जागेवर मेट्रोचे भूमिगत स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर एसटी स्थानक सध्या पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे आहे. ते तात्पुरते आहे. भूमिगत एसटी स्थानकाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता मूळ जागी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. ते दोन वर्षांत पूर्ण होईल.’’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट प्लॅननुसार स्थानकाचे काम करण्याची सूचना केली होती. त्यामुळे मेट्रो, पीएमपी, एसटी, रिक्षा, कॅबच्या प्रवाशांना एकाच इमारतीमधून वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होतील, असा त्या मागे उद्देश होता. परंतु, महाविकास आघाडीने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचे शिरोळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर भुसे यांनी ‘‘नागरिकांची सध्या गैरसोय होत असली तरी, दोन वर्षांत स्थानकाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर तेथेच इंटिग्रेटेड पद्धतीने स्थानक उभारण्यात येईल. त्यासाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यात करार झाला आहे. त्याच्या आधारे आणि आवश्यकतेनुसार खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) या इंटिग्रेटेड स्थानकाचे काम पूर्ण करण्यात येईल,’’ असे स्पष्ट केले. परिवहन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे. परंतु, ते उपलब्ध नसल्यामुळे भुसे यांनी शिरोळे यांच्या लक्षवेधीला उत्तर दिले.