
बेडेकर गणपती मंदिरात संगीत महोत्सव
पुणे, ता. १५ ः ॐ बेडेकर गणपती मंदिर व तालचक्र यांच्यातर्फे गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच २२ ते ३० मार्च दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मयूर कॉलनी येथील ॐ बेडेकर गणपती मंदिरात दररोज सायंकाळी ६ वाजता महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत. यात पं. रघुनंदन पणशीकर. पं. शौनक अभिषेकी, भुवनेश कोमकली, विदुषी मंजूषा पाटील, कल्याण अपार, अनुजा झोकरकर, सौरभ काडगावकर, मेहेर परळीकर, रागेश्री वैरागकर आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. ३० मार्चला सकाळी १०.३० वाजता मिलिंदबुवा बडवे यांचे कीर्तन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सिंधी साहित्य अकादमीच्या
सदस्यपदी सुरेश हेमनानी
पुणे, ता. १५ ः महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी पुण्यातील सुरेश हेमनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यासंबंधीचे परिपत्रक काढण्यात आले. यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता अशी हेमनानी यांची ओळख आहे. ते भारतीय सिंधू सभेचे राज्य अध्यक्ष, इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनचे राष्ट्रीय खजिनदार आहेत.
‘धन्य मी कृतार्थ माता’
कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ता. १५ ः ‘आमच्या मुलांनी कर्तृत्वाने आणि कष्टाने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांची आई म्हणून समाजात मिळत असलेली ओळख सुखावणारी आहे’, अशा शब्दांत कर्तृत्ववान मुलांच्या मातांनी मनोगत व्यक्त केले. निमित्त होते, जागतिक महिला दिनानिमित्त हिंदू महिला सभेतर्फे आयोजित ‘धन्य मी कृतार्थ माता’ या कार्यक्रमाचे. या वेळी व्याख्याता धनश्री लेले यांची आई माधवी गोखले, ‘मधुराज रेसिपीज्’च्या मधुरा बाचल यांच्या आई कल्पना माळवदे, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या आई विजया बर्वे, ‘यलो’ चित्रपट फेम गौरी गाडगीळ यांच्या आई स्नेहा गाडगीळ, हुतात्मा विनायक गोरे यांच्या आई अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुप्रिया दामले यांनी आभार मानले.