
पाण्याचे १५ ऑगस्टपर्यंत नियोजन
पुणे, ता. १७ ः दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन १५ जुलैपर्यंतचे नियोजन करतात. पण यंदा एल निनोचा प्रभाव आणि पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे यंदा १५ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी हालचाल सुरू आहे. यासंदर्भात गुरुवारी महापालिका व पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठक झाली.
राज्यात मॉन्सूनचे आगमन जूनच्या पहिल्याच आठवड्यात होत असले तरी मोठ्या पावसाला सुरवता होत नाही. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चारही धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही. पण त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी कपातीची स्थिती निर्माण होते. पण जुलै महिन्यात पावसाला सुरुवात होऊन पुणेकरांना दिलासा मिळतो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव असणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जून, जुलैमध्ये पाऊस कमी झाला तर पाणी कपातीची नामुष्की येऊ शकते.
खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात सध्या सुमारे १७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी पेक्षा एक टीएमसी पाणी जास्त असले तरीही अद्याप शेतीचे दोन आवर्तन दिले जाणार आहेत. यासाठी सुमारे १० टीएमसी पाणी आवश्यक आहे. पुणे महापालिका सध्या खडकवासला धरणातून रोज १४७५ एमएलडी पाणी घेत आहे. याच प्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी घेतले तर सात टीएमसी पाण्याची आवश्यकता पुणे शहरासाठी भासेल. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन केले तरी पाणी कपातीची गरज पडणार नाही, पण पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे, अशी चर्चा या बैठकीत झाली. दरम्यान, पुढील महिन्यात कालवा समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेत आज झालेल्या बैठकीला आयुक्त विक्रम कुमार, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी अधिकारी उपस्थित होते.
पाटबंधारे आणि महापालिकेमध्ये गुरुवारी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. यामध्ये एल निनोचा विचार करून १५ ऑगस्टपर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करावे अशी चर्चा झाली आहे. पण कोणताही निर्णय झालेला नाही. पुढच्या महिन्यात यासंदर्भात पुन्हा एकदा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच कालवा समितीच्या बैठकीतही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा